भाजपाच नंबर वन!

By admin | Published: January 10, 2017 05:11 AM2017-01-10T05:11:59+5:302017-01-10T05:19:36+5:30

राज्यात झालेल्या १९१ नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक १२०७ जागा आणि ७१ ठिकाणचे नगराध्यक्षपद पटकावून भारतीय जनता पार्टीने

BJP is number one! | भाजपाच नंबर वन!

भाजपाच नंबर वन!

Next

मुंबई/नागपूर : राज्यात झालेल्या १९१ नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक १२०७ जागा आणि ७१ ठिकाणचे नगराध्यक्षपद पटकावून भारतीय जनता पार्टीने बाजी मारली असून काँग्रेस ९१९ जागा आणि ३४ नगराध्यक्षांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहिले.
राज्यातील १९१ नगरपालिकांसाठी चार टप्प्यांत निवडणूक झाली. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय भाजपाच्या चांगलाच पथ्यावर पडला. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. पैशासाठी लोकांना बँकांसमोर लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या. अनेकांनी लग्नकार्ये पुढे ढकलली. त्यामुळे नोटाबंदीचा सत्ताधारी भाजपाला फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, तो खोटा ठरला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि समस्त मंत्रिगण भाजपाने प्रचारात उतरविले होते. शिवाय, गरजेनुसार स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे धोरण पक्षाने ठेवल्याने त्याचाही फायदा भाजपाला झाला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुठेही प्रचाराला गेले नाहीत. त्याचा फटका सेनेला बसला. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि स्थानिक नेते प्रचारात उतरले होते. काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढविली. त्याचा फायदा झाल्याचे दिसून येते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण उडाली. स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि डझनभर नेत्यांनी शहरं पिंजून काढली तरी या पक्षाच्या पदरात केवळ २२ ठिकाणचे नगराध्यक्षपद पडले.

चौथा टप्पाही जिंकला
चौथ्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली. सात नगराध्यक्ष पदांसह सर्वाधिक जागा भाजपाच्या पारड्यात पडल्या आहेत. काँग्रेस व इतरांना दोन नगराध्यक्ष पदं मिळाली. चौथ्या टप्प्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.


काटोलमध्ये ‘विदर्भ माझा’
काटोलमध्ये भाजपातून बाहेर पडलेले चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या उमेदवारांना राजकुमार तिरपुडे यांच्या ‘विदर्भ माझा’ या पक्षाच्या चिन्हावर लढवित २३ पैकी १८ जागा जिंकून सत्ता मिळवली. विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदी निवडून आल्या. विदर्भाच्या नावावर नव्यानेच स्थापलेल्या पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याने विदर्भवाद्यांचे मनोबल उंचावले.

Web Title: BJP is number one!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.