भाजपच्या आमदाराविरोधात पक्षाचे पदाधिकारी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 11:19 PM2019-08-18T23:19:16+5:302019-08-18T23:19:26+5:30
भारसाकळे यांना होणा-या विरोधाचे लोण आता मतदारसंघात सर्वदूर पोहचत आहे. तेल्हारा येथे रविवारी भागवत मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तेल्हारा : अकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. रविवारी तेल्हाऱ्यात झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक उमदेवार देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. तसे निवेदन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आले आहे.
अकोट मतदारसंघासाठी स्थानिक उमेदवार द्या, अशी मागणी भाजपमधूनच होत आहे. त्याची सुरुवात अकोट येथे गेल्या आठवड्यात बैठकीमध्ये झाली व त्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना अशा मागणीचे निवेदन ही देण्यात आले. भारसाकळे यांना होणा-या विरोधाचे लोण आता मतदारसंघात सर्वदूर पोहचत आहे. तेल्हारा येथे रविवारी भागवत मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, बुथप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गतवेळी इतर पक्षातून व अमरावती जिल्ह्यातून आलेले प्रकाश भारसाकळे यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी दिली. तरीही तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याने एकदिलाने पक्षाचे काम करून त्यांना विजयी केले; पण आ. प्रकाश भरसाकळे हे पदाधिकारी, बुथप्रमुख व कार्यकर्ते यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. तसेच ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची वागणूक योग्य नाही. त्यांची नाळ रुजली नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यास उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.