ठाकरे -शिंदे मनोमिलनास भाजपमधूनच होतोय विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 11:17 AM2022-07-13T11:17:47+5:302022-07-13T11:18:23+5:30

हिंदुत्वात ठाकरे वाटेकरी नकोत, एकत्र आल्यास रणनीती फसेल 

BJP opposes uddhav Thackeray eknath Shinde alliance maharashtra political crisis | ठाकरे -शिंदे मनोमिलनास भाजपमधूनच होतोय विरोध 

ठाकरे -शिंदे मनोमिलनास भाजपमधूनच होतोय विरोध 

googlenewsNext

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मनोमिलन घडवून आणण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांकडून होत असले तरी शिंदे यांनी पुन्हा ठाकरेंसोबत जाणे भाजपला पसंत नसेल, असे म्हटले जात आहे.

शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांना भाजपने सोबत घेतले व सरकार स्थापन करताना शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप अशी युती करून २०२४ लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकाव्यात, अशी रणनीती भाजपने आखली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेवरील एकछत्री अमलाला शह देणे आणि भाजपशी चांगला समन्वय राखून पुढे जाण्याच्या शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सोबत घेणे हा भाजपचा दुहेरी उद्देश आहे. मात्र, उद्या ठाकरे-शिंदे एकत्र आले तर भाजपची सगळीच रणनीती फसणार आहे. त्यामुळेच भाजपला ठाकरे-शिंदे एकत्र येणे मान्य नसेल, असे मानले जाते. 

हिंदुत्वामध्ये ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा वाटा भाजपला नको आहे. ठाकरे यांनी गेली काही वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व एकूणच भाजपवर सडकून टीका केली व अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका सुरू केली. शिवसेना केवळ महाराष्ट्रात असली तरी त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळते. त्यामुळे एकदाचा ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अस्तित्वावरच घाला घालण्याची रणनीती भाजपने आखली व शिंदे यांच्या नेतृत्वात बंड घडवून आणले. त्यामुळे आता ठाकरे-शिंदे एकत्र येणे भाजपच्या संपूर्ण खेळीला तडा देणारे असेल. त्यामुळे भाजप ते होऊ देणार नाही, असे म्हटले जात आहे.

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले, की ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येतील असे आम्हाला वाटत नाही. तसे होणार असेल तर एकूणच सर्व गोष्टींचा फेरविचार आम्हाला करावा लागेल. एक निश्चित अशी भूमिका घेऊन शिंदे हे आमच्यासोबत आले आहेत आणि ते परत वेगळा निर्णय घेतील असे आम्हाला वाटत नाही.

एकत्र येण्यासाठी अजूनही आहे वाव
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि शिंदे यांना सन्मानाने बोलावून सोबत घ्यावे. शिंदे हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील आणि ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतच सर्व ५४ आमदार, १८ खासदार काम करतील, असा मार्ग काढण्याचा प्रयत्न शिवसेनेतील दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांकडून सध्या होत आहे. ठाकरे व त्यांच्या परिवाराविरुद्ध आम्ही कोणतीही वैयक्तिक टीका करणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. 

एकनाथ शिंदे यांना अजूनही सन्मानाने बोलवा, चर्चा करा व तोडगा काढा, अशी भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते  दीपक केसरकर यांनी मांडली आहे. जे सोडून गेले ते परत आले तर मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असतील, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे-शिंदे एकत्र येण्याला अजूनही वाव असल्याची चर्चा आहे.

Web Title: BJP opposes uddhav Thackeray eknath Shinde alliance maharashtra political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.