१२ डिसेंबरला नवा संकल्प, कराल का साध्य?; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 09:49 AM2021-12-09T09:49:34+5:302021-12-09T09:49:47+5:30
संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मुंबई – भाजपा नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबरला जयंती असते. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांत दिल्ली येथे अपघातात गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला आहे. १२ डिसेंबरला गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा यांनी भावनिक पत्र लिहिलं आहे. या जयंतीच्या दिवशी पंकजा नवा संकल्प करणार असल्याचं म्हटलं आहे.
पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात की, १२ डिसेंबर, ३ जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीनं होतो याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांना जातं. तुमच्या एवढं सच्च अनोखं नातं माझ्या जीवनात कोणतंही नाही. प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन, अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामूहिक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी अनेक कार्यक्रम आपण केले असं त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात अनेक मान्यवर अमित शाह, मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती सर्व गडावर आले. गोपीनाथ गडावर संघर्ष न्याय दिन साजरे झाले. अनेक दु:खी कुटुंबीयांना मदत केली. अनेक रुग्णांचे उपचार झाले. खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मूळी, हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील. सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 8, 2021
दरम्यान, कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यावर, नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपलुकी विना असणाऱ्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे गुरु, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं! या १२ डिसेंबरला एक संकल्प द्यावा म्हणते ऐकाल का? सोपा आणि साधा संकल्प कराल का साध्य? असं पंकजा मुंडे यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे. त्यामुळे १२ डिसेंबरला पंकजा मुंडे कोणता संकल्प हाती घेणार आहेत हे अद्याप तरी अस्पष्ट आहे.