“मला आलेल्या ऑफरकडे मी बघणार नाही असे नाही”; पंकजा मुंडेंचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:01 PM2023-06-30T12:01:33+5:302023-06-30T12:02:16+5:30
Pankaja Munde: माझ्याविषयी कोणी सकारात्मक बोलत असेल तर मी नाकारात्मक बोलण्याचा प्रश्न येत नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
Pankaja Munde: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस, नव्याने महाराष्ट्रात पाय रोवत असलेला बीआरएस तसेच अन्य पक्षांकडून पंकजा मुंडे यांना ऑफर येत आहेत. पंकजा मुंडेंनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, तर त्या कोणत्या पक्षात जाऊ शकतील, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यातच आता मला आलेल्या ऑफरकडे मी बघणार नाही असे नाही, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचे म्हटले जात आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे आणि उपमुख्यंत्री एकाच व्यासपीठावर दिसतील. सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस तीन वेळा बीड जिल्ह्यात आले होते. तीनही वेळा पंकजा मुंडे कार्यक्रमांना उपस्थित नव्हत्या. त्यामुळे दोन्ही नेते एका कार्यक्रमात येणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावेळी मीडियाशी बोलताना पंकजा मुंडे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
मला आलेल्या ऑफरकडे मी बघणार नाही असे नाही
सर्व पक्ष माझ्याविषयी सकारात्मक बोलत आहेत. माझ्याविषयी कोणी सकारात्मक बोलत असेल तर कोणाविषयी मी नाकारात्मक बोलण्याचा प्रश्न येत नाही. मला आलेल्या ऑफरवर मी सध्या सिरीयसली बघितले नाही मात्र मी बघणार नाही असे नाही. कारण कोणत्याही व्यक्तीला सिरीयसली न घेणे हा त्यांचा अपमान असतो, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, बीडमधील कार्यक्रमावर पंकजा मुंडे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र येण्याचे काही महत्त्व नाही. आधीच्या कार्यक्रमात मी अपेक्षीत नव्हते. हा काही योग नाही. विनायक मेटे यांच्या पत्नी यांनी मला स्वत: बोलावले आहे, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.