“अन्यथा मराठा समाज आणखी उद्विग्न होईल, सत्ताधाऱ्यांनी आता...”; पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 11:51 AM2023-09-04T11:51:02+5:302023-09-04T11:55:58+5:30

Pankaja Munde Reaction Over Maratha Reservation: मराठा समाजाला दिलेले शब्द पूर्ण होऊ शकले नाहीत. सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी, असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.

bjp pankaja munde reaction over maratha reservation and jalna incident | “अन्यथा मराठा समाज आणखी उद्विग्न होईल, सत्ताधाऱ्यांनी आता...”; पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या

“अन्यथा मराठा समाज आणखी उद्विग्न होईल, सत्ताधाऱ्यांनी आता...”; पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या

googlenewsNext

Pankaja Munde Reaction Over Maratha Reservation: जालना जिल्ह्यालीत आंतरवाली येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. यानंतर मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. ठिकठिकाणी आंदोलकांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी जालना येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे. यातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका व्यक्त केली आहे. 

राजकारणातून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पंकजा मुंडे शिवशक्ती परिक्रमा करत आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांनी मीडियाशी संवाद साधला. गेले दोन दशक मुंडे, भुजबळ, वडट्टीवार, नाना पटोले यांनी ओबीसी भूमिका मांडत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही. हा विषय संवैधानिक आहे. मराठा समाजाची मागणी स्पष्ट आहे. त्या मागणीवरचा आमचा पाठिंबाही स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सफल होऊ शकत नाही, कारण जे घटनेला शक्य आहे ते करणे आवश्यक आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

...तर मराठा समाज आणखी उद्विग्न होईल

उगीचच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द देईल आणि तो शब्द अपूर्ण राहिला तर मराठा समाज आणखी उद्विग्न होईल, असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केले. तसेच मराठा समाजाच्या आंदोलनाच्या या परिस्थितीकडे फार चिंतेने पाहते. कोणताही राजकारणी एक मिशन घेऊन समाजातील सर्व लोकांना दिलेला शब्द पाळणारा असतो. मराठा समाजाची उद्विग्नता पाहून मला त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करावसे वाटते. मराठा समाजाला दिलेले शब्द पूर्ण होऊ शकले नाहीत, ही उद्विग्नता त्यांच्या मनामध्ये आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागण्यासाठी न्याय प्रक्रियेत काय निर्णय होईल, यावर मुक्त चर्चा करून योग्य निर्णय झाला पाहिजे. जालन्यात जे घडले त्याबाबत मी दुःख व्यक्त केले आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी. मायबापाची भूमिका ही प्रसंगी हळवी, प्रेमळ आणि कडक अशी असते. अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घ्यावी. सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांच्या मागणीचा विचार करून निष्पक्ष चौकशी करावी. मराठा आरक्षणाविषयी सत्ताधाऱ्यांनी जी समिती नेमली आहे, कागदपत्र तयार केले आहेत. ते न्यायालयात टीकतील अशी भूमिका घ्यावी. ओबीसी आरक्षणाचा विषय आणि मराठा समाजाचा विषय वेगळा आहे. त्यामुळे या दोन्ही वेगळ्या विषयांना एकत्र करण्याची आवश्यकता नाही. मराठा समाजाला ओबीसीबाबत अपेक्षाही नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
 

Web Title: bjp pankaja munde reaction over maratha reservation and jalna incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.