Eknath Shinde Group: आता शिंदे गटाने भाजपाचेच पदाधिकारी फोडले; १०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 07:39 PM2022-09-18T19:39:49+5:302022-09-18T19:40:48+5:30
ठाकरे गट शिवसेना आणि नुकतेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडल्यानंतर शिंदे गटाने फडणवीसांनाच धक्का दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला धक्का दिल्यानंतर शिंदे गटात राज्यभरातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होऊ लागले होते. यातच शिंदे यांनी राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. परंतू, आता शिंदे गटाने फडणवीसांनाही धक्का देण्यास सुरुवात झाली आहे.
शिंदे गटाने दहिसरमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोडले आहेत. मुंबईत १०० हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत या महिला कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
सुर्वे यांच्या मतदारसंघात असलेल्या मुंबई वॉर्ड क्र. २५ मध्ये हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये भाजपाचे माजी वॉर्ड अध्यक्षा देखील होत्या. त्यांच्यासह कार्यकर्त्या महिलांनी शिवसेनेत हा प्रवेश केला.
नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 माजी नगरसेवक आणि 6 तालुकाध्यक्षांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख यांनी शिंदे गटात प्रवेश केला.