सत्ता जाताच भाजपच्या अंतर्गत कुरघोड्या चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 12:37 PM2019-12-05T12:37:54+5:302019-12-05T12:38:50+5:30
वास्तविक पाहता भाजप अत्यंत शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपूर्वीपर्यंत प्रत्येक नेत्याच्या बोलण्यात सुसुत्रता होती. तर अनेक नेते माध्यमांसमोर बोलण्याचे टाळत होते. आता मात्र नाराज नेत्यांनी बोलण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई - राज्यातील सत्ता जाताच भाजपला एकापोठापाठ धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. एकनाथ खडसे यांनी आवाज बुलंद केल्यानंतर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आघाडी घेतली आहे. राज्यातील नेतृत्व ओबीसी नेत्यांना डावलण्याचे काम करत असल्याची तक्रार या नेत्यांची असून पंकजा मुंडे यांची त्यांना साथ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी बुधवारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाजपच्या विधानसभेला कमी झालेल्या जागा आणि प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही सत्तेबाहेर गेल्याचे बाबीवर प्रकाश टाकला होता. तर प्रकाश शेंडगे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात गौप्यस्फोट केला होता.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पक्षातून हकापट्टी करण्यासाठी दिल्लीतून आदेश आला होता. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर हा निरोप घेऊन आले होते. मात्र आम्ही विरोधी केल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी सावध राहावे, असा इशारा शेंडगे यांनी केला. त्यामुळे भाजपमध्ये येणाऱ्या काळात अनेक नेते बंड करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वास्तविक पाहता भाजप अत्यंत शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपूर्वीपर्यंत प्रत्येक नेत्याच्या बोलण्यात सुसुत्रता होती. तर अनेक नेते माध्यमांसमोर बोलण्याचे टाळत होते. आता मात्र नाराज नेत्यांनी बोलण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामुळे भाजपमधील अंतर्गत कुरघोड्या चव्हाट्यावर येत आहे.