Pravin Darekar : "बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची आपुलकीने चौकशी करायचे"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 03:24 PM2022-10-27T15:24:35+5:302022-10-27T15:35:38+5:30
BJP Pravin Darekar : "बाळासाहेब ठाकरे हे नाराज शिवसैनिकांना बोलवायचे, त्यांची आपुलकीने चौकशी करायचे, मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे. त्याच्याशी चर्चा करायचे त्यानंतर पुन्हा ही नाराज मंडळी शिवसेनेच्या प्रवाहात सहभागी होऊन काम करायची."
भाजपाचे नेते प्रवीण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा ते नाराज शिवसैनिकांची विचारपूस करायचे, त्याच्याशी चर्चा करायचे पण आता अहंकार आडवा येत असल्याचा टोला दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. गेलेल्यांची त्यांना पर्वा नाही त्यामुळे त्याची किंमत ते मोजत आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे.
प्रवीण दरेकर यांनी "सध्याच्या शिवसेनेत हाच तर प्रॉब्लेम आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाराज शिवसैनिकांना बोलवायचे, त्यांची आपुलकीने चौकशी करायचे, मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे. त्याच्याशी चर्चा करायचे त्यानंतर पुन्हा ही नाराज मंडळी शिवसेनेच्या प्रवाहात सहभागी होऊन काम करायची. मात्र आता जे सोडून गेले ते लोक यांना महत्त्वाचे वाटत नाहीत" असं म्हटलं आहे.
"54 आमदारांपैकी 40 आमदार सोडून गेलेत, ते आमदार यांच्यासाठी महत्त्वाचे नाहीत. कारण यांचा अहंकार आडवा येतो. यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. आता ते भारत जोडो यांत्रेला देखील उपस्थित राहणार आहेत. गेलेल्यांची त्यांना पर्वा नाही त्यामुळे त्याची किंमत ते मोजत आहेत" असा टोला प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
शिंदे गटातील सर्वच आमदार खूश आहेत असं नाही. अनेकजण दबावापोटी तिकडे गेले आहेत. परंतु भविष्यात त्यांना स्वत:ला वाचायचं आणि वाचवायचं असेल तर भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी याआधी केला आहे. पेडणेकरांनी भाजपावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला होता.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, एकनाथ शिंदे हे मूळचे शिवसैनिक, परंतु आता मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची वागणूक यात जमीन आस्मानचा फरक आहे. ते कुणाची तरी स्क्रिप्ट वाचून दाखवतायेत का असा प्रश्न निर्माण होतो. हे मुख्यमंत्री स्वत:चं वाक्य बोलत नाही हे वारंवार दिसते. जुन्या कडीला ऊत आणून वातावरण अस्थिर करण्याचं कुठल्या पक्षाला हवं हे सर्वांना माहिती आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं होतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"