“मी बोलेन तेच समाज या समजुतीतून मनोज जरांगेंनी बाहेर यावे, भाजपा...”; दरेकरांनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:29 PM2024-07-22T16:29:32+5:302024-07-22T16:31:35+5:30
BJP Pravin Darekar Replied Manoj Jarange: मनोज जरांगे एक प्रकारे महाविकास आघाडीचा बचाव करत आहेत. भाजपा सर्वांना सोबत नेणारा पक्ष आहे. आम्हीही २० वर्षे राजकारणात आहोत, असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.
BJP Pravin Darekar Replied Manoj Jarange: मराठा आरक्षण, सगेसोयरेची अंमलबजावणी यासह अन्य विविध मागण्यांवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. भाजपा नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यामध्ये प्रवीण दरेकर हेही मनोज जरांगेंवर टीका करत आहेत. पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेत यावे. त्यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण मी बोलेन तेच समाज या अविर्भावातून जरांगे यांनी बाहेर पडावे. मनोज जरांगे एक प्रकारे महाविकास आघाडीचा बचाव करत आहेत. त्यांनी शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना विचारावे की, ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर भूमिका काय, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली.
आम्ही संघर्षातून तयार झालो आहोत, उत्तरे देऊ शकतो
आंदोलनामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका. राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नावर फोकस करा. सरकार मराठा समाजासाठी काय करते, ते आम्ही दाखवले. मराठा समाजाच्या प्रश्नी सरकार सकारात्मक आहे. आमच्या मुद्द्यांवर इतर देण्याऐवजी शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही, आम्हीही २० वर्षे राजकारणात आहोत. आम्ही संघर्षातून तयार झालो आहोत. आम्ही उत्तर देऊ शकतो. त्यांनी हमरी-तुमरीची भाषा टाळावी. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केला का, असा थेट सवाल प्रवीण दरेकर यांनी केला.
दरम्यान, भाजपा सर्वांना सोबत नेणारा पक्ष आहे. भाजपा पक्ष दलित, आदिवासी समाजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणे हा भाजपाचा गाभा आहे. पण सध्या जाती-जातीत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, असे दरेकर म्हणाले.