“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 02:58 PM2024-05-26T14:58:02+5:302024-05-26T14:59:01+5:30
BJP Pravin Darekar News: संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे. ते भ्रमिष्ट झाले आहेत, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.
BJP Pravin Darekar News: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान झाले असून, आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या एका आरोपावरून भाजपा नेत्यांनी जोरदार पटलवार केला आहे.
४ जूननंतर भाजपात मोदी-शाह यांना पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरींचा नागपूरात पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपूरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपूरात उघडपणे बोलताना दिसतात, असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावरून आता भाजपा नेते आणि आमदार प्रविण दरेकर यांनी पलटवार केला आहे.
संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी
संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी करावी, आमचा पक्ष आणि हा देश मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल. ४ जूननंतर संजय राऊतांचे थोबाड फुटलेले आपल्याला दिसेल. कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे. हे जाहीर सभांमधून अगदी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे मोदी-योगी असं चित्र उभे करू नका. संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारच शोधून शोधून, काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात, या शब्दांत प्रविण दरेकर यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, नितीन गडकरींच्या संदर्भातील वक्तव्य म्हणजे, संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस. कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना देवेंद्र फडणवीस यांनी आणखी विजय भक्कम व्हावा, यासाठी काय योगदान दिले आहे, ते नागपूरवासियांना माहीत आहे. संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे. अगोदर बोलायचे विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचे प्रचारात उतरले, संजय राऊत टीका करताना सुद्धा काय नेमके बोलायचे, हे निश्चित करून घ्या, असा पलटवार दरेकर यांनी केला.