Maharashtra Politics: भाजपचा मेगा प्लान! उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला काबीज करणार; नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 11:40 AM2022-10-14T11:40:52+5:302022-10-14T11:41:32+5:30
Maharashtra Politics: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी मोठी रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष वाढत असल्याचे दिसत आहे. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून नवे नाव आणि चिन्ह दिले आहे. याचा फायदा घेत आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी कंबर कसली असून, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेला लागलेली गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून, पक्ष वाचवण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. भाजपकडून सातत्याने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. आता ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपकडून रनणिती तयार करण्यात आली आहे. ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी नारायण राणेंवर सोपवण्यात आली आहे.
नारायण राणे लागले कामाला
पक्षाने दिलेल्या जबाबदारीनंतर नारायण राणे हे तयारीला लागले आहेत. नारायण राणे यांचे मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम होत आहेत. तसेच आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातही नारायण राणेंचे संघटनात्मक कार्यक्रम होणार आहेत. नारायण राणेंच्या मदतीने ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मशाल चिन्ह देण्यात आले आहे. नवे चिन्ह मिळताच ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच मशाल चिन्हाचे बॅनर लावल्याचे पहायला मिळाले .
दरम्यान, राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि माजी आमदार अवधूत तटकरे हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. तटकरेंसोबत झालेल्या वादानंतर अवधूत तटकरे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. या जागेवर शिवसेनेने अवधूत तटकरेंना उमेदवारी न देता विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"