भाजपाध्यक्ष अमित शहा उद्या ठाण्यात
By admin | Published: April 20, 2017 04:09 AM2017-04-20T04:09:14+5:302017-04-20T04:09:14+5:30
स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान व स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने
ठाणे : स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान व स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २१ ते रविवार २३ एप्रिल या कालावधीत ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे एकोणतिसावे अ.भा. सावरकर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, भाषण, अभिवाचन, समारोप सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हे संमेलन रंगणार आहे. शनिवारी, २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११.३० यावेळेत ‘भारताची संरक्षण सिद्धता’ हा परिसंवाद एअर मार्शल भूषण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात मेजर शशिकांत पित्रे व कमांडर सुबोध पुरोहित हे वक्ते सहभागी होणार आहेत. दुपारी १२ ते १ यावेळेत ‘सावरकर आजच्या संदर्भात’ यावर प्रकाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली भाषण होणार असून वक्ते म्हणून शंतनू रिठे सहभागी होणार आहेत. दुपारी ३ ते ५ यावेळेत डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सावरकरांचे साहित्य विश्व’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून यात डॉ. शरद हेबाळकर व प्रमोद पवार सहभागी होणार आहेत. रविवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ९.४५ यावेळेत माधव खाडिलकरलिखित ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे अभिवाचन होणार असून यात वेदश्री ओक-खाडिलकर, संतोष वेरूळकर, सुनीता फडके हे कलाकार सहभागी होणार आहेत.
सकाळी १० ते १२ यावेळेत डॉ. अशोक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतातल्या समाजसुधारणा : विविध प्रयत्न’ या विषयावर परिसंवाद होणार असून वक्ते म्हणून प्रा. रमेश कांबळे, डॉ. नीलम गोऱ्हे, अॅड. किशोर जावळे हे वक्ते सहभागी होणार आहे.
दुपारी १२.३० ते १.३० यावेळेत चंद्रकांत शहासने यांच्या अध्यक्षतेखाली ‘अल्पज्ञात सावरकर’ या विषयावर भाषण होणार असून विक्रम एडके हे वक्ते सहभागी होणार आहेत.
दुपारी ३ ते ४.४५ यावेळेत डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ‘सावरकरांवरील आक्षेप व निराकरण’ विषयावर होणाऱ्या परिसंवादात गजानन नेरकर व अरविंद कुलकर्णी सहभागी होणार आहे. समारोप सोहळा रविवार २३ एप्रिल रोजी सायं. ५ वा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी शिक्षण, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)