सावनेरमध्ये भाजपला धक्का
By Admin | Published: October 1, 2014 12:54 AM2014-10-01T00:54:13+5:302014-10-01T00:54:13+5:30
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी सावनेर मतदारसंघातून रिंगणात उतरविलेले उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला. तर रामटेक विधानसभा
मुसळेंचा अर्ज बाद : रेड्डी रिंगणात कायम
सावनेर/रामटेक : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी सावनेर मतदारसंघातून रिंगणात उतरविलेले उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला. तर रामटेक विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या उमदेवारीवरही आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर दोन्ही पक्षाची बाजू आणि कागदोपत्री पुरावे तपासल्यानंतर रेड्डी यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही उमदेवार शासकीय कंत्राटदार असल्याचा आरोप करीत त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला होता.
भाजपचे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सोनबा मुसळे हे मुसळे कन्स्ट्रक्शनचे भागीदार असून, त्याद्वारे शासकीय कामाचे कंत्राट घेतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ९ (अ) मधील तरतुदीनुसार विधानसभा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याबाबत मनीष मोहोड (रा. माळेगाव) यांनी करीत लेखी तक्रार आक्षेप घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत केलेल्या १२ कामांची यादीही त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमक्ष सादर केली. या आक्षेपाच्या अनुषंगाने सोनबा मुसळे यांना त्यांची बाजू मांडण्याची सोमवारी संधी देण्यात आली. त्यात मुसळे कन्स्ट्रक्शन कंपनी ही सोनबा मुसळे यांच्यासह त्यांची पत्नी कल्पना आणि मुलगा रोहित हे भागीदारीत चालवितात. या फर्ममधून भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे हे २६ सप्टेंबर रोजीच मुक्त झाले असल्याचे शपथपत्र अॅड. किल्लोर यांनी सादर केले. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनोद हरकंडे यांनी निकाल राखून ठेवला. मंगळवारी त्यावर सुनावणी करताना शासकीय कंत्राटदार असल्याचे सांगून सोनबा मुसळे यांचा अर्ज अवैध ठरविला.