Maharashtra Politics: “तुमचं सरकार होतं, तेव्हा तुम्ही काय करत होता?” राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 09:23 AM2022-10-26T09:23:29+5:302022-10-26T09:24:40+5:30
Maharashtra News: शेतकरी आणि कार्यकर्ते कायमचे परावलंबी राहिले पाहिजेत. असे राजकारण शरद पवारांनी अनेक वर्षांपासून केले, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
Maharashtra Politics: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अनेक निर्णयांची घोषणा केली. तर ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. यावरून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीही झाली. यातच भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याला भाजप नेते आणि विद्यमान सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनी प्रत्युत्तर दिले असून, तुमचे सरकार होते, तेव्हा तुम्ही काय करत होतात, असा रोकडा सवालही केला आहे.
गेल्या दहा वर्षात भू-विकास बँकेने एका शेतकऱ्याला तरी कर्ज दिले का? भू-विकास बँक अस्तित्वात तरी आहे का? २५ ते ३० वर्षापासून बँकेने कर्ज वसुली केली नाही. राहिलेले कर्ज वसूल होणार नाही, हे कळल्यावर सरकारने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला, अशी टीका शरद पवारांनी केली होती. याला आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर दिले आहे. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार एक-एक पाऊल टाकत आहे, हे पाहून त्यांना दु:ख होतेय, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.
तेव्हा तुम्ही काय करत होता?
भू-विकास बँकेच्या रकमा जर जुन्या होत्या, तर तुमच्या काळात त्या माफ का केल्या नाहीत? तेव्हा तुमचे सरकार होते, तेव्हा तुम्ही काय करत होता? त्यामुळे अशाप्रकारचे विधान करताना पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे, असा टोला विखे-पाटील यांनी लगावला. तसेच शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर अद्यापही भू-विकास बँकेचे बोझे आहेत. आता ते १०० टक्के माफ झाले आहे. लोकं त्यातून मोकळे झाले आहेत. लोकं कायमचे परावलंबी राहिले पाहिजेत. शेतकरी किंवा कार्यकर्ते परावलंबी राहिल्याशिवाय नेत्याचे महत्त्व वाढत नाही, असे राजकारण त्यांनी अनेक वर्षांपासून केले आहे. त्यामुळे या निर्णयाचं त्यांना दु:ख होणे स्वाभाविक आहे, असा पलटवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
दरम्यान, ज्यांच्या हातात देशाची, राज्याची सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी काही ठोस पाऊले टाकली पाहिजे ती टाकायची त्यांची तयारी नाही. निर्णय घ्यायला तयार नाहीत. १९७८ मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा १५ दिवसांत मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी आली तेव्हा ३ महिन्यात ७२ हजार कोटींचे शेतकरी कर्ज माफ केले होते, अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"