Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरेंना आमदार केलं, तेव्हा शिवसैनिक आठवला नाही का?”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 04:23 PM2023-03-06T16:23:25+5:302023-03-06T16:24:26+5:30
Maharashtra News: पूर्वी भाजपमध्ये साधू-संत दिसत होते. आता संधीसाधू दिसायला लागले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेत केली होती.
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेतील गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट, केंद्रातील मोदी सरकार यांच्यावर सडकून टीका केली. याला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरेंना आमदार केले, तेव्हा शिवसैनिक आठवला नाही का, अशी विचारणा करण्यात आली आहे.
भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी टीकेचा समाचार घेतला आहे. पूर्वी एक जमाना होता, तेव्हा हिंदुत्वाचे पवित्र वातावरण होते. त्यावेळेस भाजपच्या व्यासपीठावर साधू-संत दिसत होते. आता संधीसाधू दिसायला लागले आहेत. हे लोक परिवारवाद, घराणेशाहीवर बोलत असतात. होय, मी उद्धव ठाकरे अभिमानाने सांगतो की, बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे की, ते प्रबोधनकारांचे पुत्र आहेत. आमची ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी राबत आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला होता. यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पलटवार केला आहे.
तेव्हा शिवसैनिक आठवला नाही का?
उद्धव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री झाले. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी आमदार केले. तेव्हा तुम्हाला शिवसैनिक आठवला नाही का? त्यामुळे संधीसाधू तुम्ही आहात, असे प्रत्युत्तर विखे-पाटील यांनी दिले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे योगदान देश कधीच विसरणार नाही. मात्र सत्तेसाठी हे हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला नेवून बांधले तेच भाजपम नेत्यांना संधीसाधू म्हणत आहेत, याचे आश्चर्य वाटते. भाजपने कधीही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. मात्र तुम्ही त्यांच्या विचारांचे आदर्शच खुर्चीसाठी बदलून टाकली, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
दरम्यान, राज्यात बाळासाहेबांचा विचार पुढे घेवून जाणारे शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले आहे. जे जनतेच्या मनात होते तेच घडले. कोणताही निकाल यांच्या बाजूने आला की संस्था चांगली आणि विरोधात गेला की शिमगा करायचा आशी पद्धत सध्या ठाकरे गटाने सुरू केली आहे. मात्र सत्याचा स्विकार करण्याची मानसिकता ठेवा. राज्यातील जनता सूज्ञ असल्याने येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना-भाजप सर्वत्र सत्तेवर दिसेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"