“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 10:32 AM2024-06-03T10:32:30+5:302024-06-03T10:35:12+5:30
BJP Radhakrishna Vikhe Patil News: बाळासाहेब थोरात यांनी भविष्यात स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करायला सुरूवात केली पाहिजे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
BJP Radhakrishna Vikhe Patil News: लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून इंडिया आघाडी आणि एनडीएचे नेते अनेक दावे-प्रतिदावे करत आहेत. यातच राज्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळेल. एक्झिट पोल आल्यानंतर राजकीय विश्लेषक विश्लेषण करत असतात. या सर्वांना ४ जूनला उत्तर मिळेल. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही जिंकणार, हा विश्वास आम्हाला पहिल्यापासून होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून विष पेरण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेचा कामावर विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वनेते आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे मार्गदर्शन डॉ.सुजय विखे यांना आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...
बाळासाहेब थोरात यांनी थोडी तरी लाज बाळगायला हवी. ते स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात, मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये ते काँग्रेससाठी एकही जागा घेऊ शकले नाहीत. दुसऱ्यांची तळी उचलण्यामध्ये ते धन्यता मानतात. त्यांची वैचारिक दिवाळखोरी यातून सिद्ध होते. त्यांनी मदत केल्यामुळे नगर दक्षिणची जागा येईल, अशा या भ्रामक कल्पना आहेत. त्यांनी भविष्यात स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करायला सुरूवात केली पाहिजे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यायचे आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे अनेक लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहेत, असा दावा करत, महाराष्ट्रात निघालेले फतवे व उशीरा जाहीर झालेल्या जागांमुळे आम्हाला नुकसान झाले. आम्ही आता विधानसभेला जास्त काळजी घेऊ. आम्हाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.