शपथविधीचा मुहूर्त ठरला, बड्या नेत्याला निरोप गेला; मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुंबईला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:48 PM2022-08-08T14:48:28+5:302022-08-08T14:48:53+5:30
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरल्यानंतर संभाव्य मंत्री कोण असतील यावर चर्चा सुरू झाली आहे
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यात कुठल्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नंदनवन बंगल्यात बैठक सुरू आहे. त्यात मंत्रिमंडळ विस्तारातील पहिल्या यादीवर खलबतं करण्यात आली. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरल्यानंतर संभाव्य मंत्री कोण असतील यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यात भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. विखे पाटील यांना मुंबईतून निरोप आल्याचं समजतं. निरोप आल्यानंतर मतदारसंघात असणारे विखे पाटील मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत. तत्पूर्वी शिर्डी येथे जात विखे पाटील यांनी साईबाबाचं दर्शन घेतलं आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी विखे पाटलांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आल्याची चर्चा आहे.
कोण आहे राधाकृष्ण विखे पाटील?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी राज्यात विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. काँग्रेस काळात विखे पाटील यांच्याकडे गृहनिर्माण, परिवहन आणि शिक्षण खात्याचा कारभार होता. विधानसभेत शिर्डी मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते अशी चर्चा आहे.
३० जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा-शिंदे गटाचं सरकार अस्तित्वात आले. यात अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिंदे-फडणवीस यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र एक महिना झाला तरी विस्तार होत नसल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळ विस्तार कधी असा सवाल सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारला. मात्र लवकरच विस्तार होईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून देण्यात येत होते.
मोठी बातमी! २४ तासांत शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी?
नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज रात्री किंवा उद्या सकाळी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून विचारला जात होता. मागील महिनाभरात शिंदे यांनी तब्बल ६ हून अधिक वेळा दिल्ली गाठली. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडत नव्हता. खातेवाटपावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्याचसोबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी लांबत चालल्याने विस्तार रखडला असंही बोलले जायचे. परंतु निती आयोगाची बैठक संपवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईत परतले त्यानंतर जोरदार हालचाली सुरू झाल्यात. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती आहे.