“मनोज जरांगेंनी शरद पवारांना जाब विचारावा, फडणवीसांमुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 12:30 PM2024-07-25T12:30:05+5:302024-07-25T12:30:36+5:30
Radhakrishna Vikhe Patil Replied Manoj Jarange Patil: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंसह आरक्षणावर बोलायला एकही नेता तयार नाही. त्यांना राजकारण करायचे आहे, अशी टीका भाजपा नेत्याने केली.
Radhakrishna Vikhe Patil Replied Manoj Jarange Patil: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी ठाम असलेल्या मनोज जरांगे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे. १३ ऑगस्टपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. शांतता रॅलीचा पहिला टप्पा झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला मनोज जरांगे पाटील सुरुवात करणार आहेत. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका करत घणाघात केला. याला भाजपा नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मीडियाशी बोलताना भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या टीकेचा समाचार घेतला. कोणी दौरा करावा करावा नाही यासंदर्भात स्वातंत्र्य आहे. मनोज जरांगे पाटील इकडे येत असतील तर स्वागत आहे. जरांगे पाटलांना विनंती आहे, त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मार्गी लागला आहे. नंतर सरकार बदलल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्ष दिले नाही. पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही १० टक्के आरक्षण देण्याचा ठराव केला, तो टिकला आहे, त्याला कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही, असे विखे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
मनोज जरांगेंनी शरद पवारांना जाब विचारावा
मनोज जरांगे पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीसांवरच आरोप का करतात हे कळत नाही. चारवेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांना आरक्षण देऊ शकले नाही, याबद्दल मनोज जरांगेंनी जाब विचारावा. केवळ एका व्यक्तीला टार्गेट करून चालणार नाही, देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत करायला पाहिजे होते, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मला आरक्षण मान्य नाही, असे विधान शरद पवारांनी केले आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंसह आरक्षणावर बोलायला एकही नेता तयार नाही. त्यांना राजकारण करायचे आहे. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आमची भूमिका स्पष्ट केली, अशी टीका विखे पाटील यांनी केली.