“शरद पवार इतकी वर्ष सत्तेत, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही”: विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 03:40 PM2023-09-07T15:40:46+5:302023-09-07T15:41:50+5:30

Maratha Reservation: शरद पवार जाणता राजा म्हणून फिरत राहिले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काय केले? अशी विचारणा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

bjp radhakrishna vikhe patil slams uddhav thackeray and sharad pawar over maratha reservation issue | “शरद पवार इतकी वर्ष सत्तेत, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही”: विखे-पाटील

“शरद पवार इतकी वर्ष सत्तेत, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही”: विखे-पाटील

googlenewsNext

Maratha Reservation: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्लाचा निषेध संपूर्ण राज्यभरात नोंदवला गेला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या १० दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सरकारने घेतलेला निर्णय चांगला, परंतु वंशावळ या शब्दाऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, सरकारने काढलेल्या परिपत्रकात सुधारणा करा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण-विखे पाटील यांनी थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

जे आमच्या सरकारमध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकले ते महाविकास आघाडीने घालवले. आज तीच लोक उपोषणस्थळी जाऊन भाषण देत आहेत. आमची भूमिका त्यावेळेस तीच होती आजही तीच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. आमचे सरकार याची श्वेतपत्रिका काढणार आहे. त्यावेळेस मराठा बांधवांना खरे कळेल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. 

इतके वर्षे सत्तेत होता, मराठा आरक्षणासाठी काय केले?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काय केले? आता तुम्ही जालन्यात उपोषणस्थळी जाऊन भाषणे देत आहात. पण तुम्ही तुमच्या काळात मराठा बांधवांचे एवढं नुकसान केले आहे की, तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लक्तरे आता वेशीवर टांगली जातील. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही समाजबांधवांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहात. शरद पवार इतकी वर्ष सत्तेत राहिलात, जाणता राजा म्हणून फिरत राहिलात. मात्र त्यांनी आरक्षणासाठी कधी प्रयत्न केले आहेत का असे ऐकिवात नाही. शरद पवार यांनी ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न केले. केंद्रात मंत्री असताना काय प्रयत्न केले? महाविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून काय प्रयत्न केले. हे लोकांना कळू द्या, असे आव्हान राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. 

दरम्यान, मराठवाड्यातील सर्व गावे ही निजाम संस्थानमध्ये होती. त्या भागातील दाखल्यांसाठी महसूल सचिवांच्या नेतृत्वात एक समिती गठीत केली आहे. ज्यांच्याकडे कुणबी मराठ्याचे पुरावे आहेत त्यांना दाखले देण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटलांची मुख्य हीच मागणी होती. आमची ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका आहे. आम्ही जरांगे पाटलांची प्रमुख मागणी पूर्ण केली आहे. जरांगे पाटलांना विनंती आहे त्यांनी जास्त विषय ताणू नये, असे विखे-पाटील म्हणाले.


 

Web Title: bjp radhakrishna vikhe patil slams uddhav thackeray and sharad pawar over maratha reservation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.