'मविआ'ला मोठा धक्का; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर बहुमतानं विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 11:17 AM2022-07-03T11:17:28+5:302022-07-03T12:08:33+5:30
नार्वेकर यांच्या बाजूनं १६४ मतं पडली.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या १०-१२ दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातील काही गोष्टी या अभूतपूर्व अशा स्वरूपाच्या आहेत. आज राज्याच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यासाठी सर्वच पक्षांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश जारी केला होता. तशातच आता शिवसेनेच्या बंडखोर गटाने हा आदेश धुडकावून लावत शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवरून भरत गोगावले यांच्या स्वाक्षरीचा दुसरा व्हिप जारी केला होता. दरम्यान, महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात १०७ जणांनी मतदान केलं. तर ३ जण मतदानादरम्यान तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा करत नार्वेकर यांच्या नावाची घोषणा केली.
चेतन तुपे यांच्याकडून राजन साळवी यांचा प्रस्ताव देण्यात आला. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडून राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव देण्यात आला. विरोधकांनी पोल मागितल्यानं आवाजी मतदानाच्या पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अध्यक्षपदासाठी सभागृहात शिरगणती करण्यात आली. दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून शिवसेनेच्या व्हिपला केराची टोपली दाखवण्यात आली. व्हिपमध्ये ठाकरे गटातील १६ आमदारांसह सर्व आमदारांनी भाजपाच्या राहुल नार्वेकर या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश जारी करण्यात आला होता. त्यामुळे सध्या विधानसभेत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये 'व्हिप-वॉर' सुरू झाली होती. भाजपकडून राहुल नार्वेकर, तर शिवसेनेकडून राजन साळवी रिंगणात होते. अध्यक्षपदासाठी मतदानाची मागणी करण्यात आली होती.
या निवडणुकीत नार्वेकर यांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने (शिंदे गट) आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित १६ आमदारांना देखील लागू असल्याचं सांगण्यात आलं होतं. व्हीपची प्रत या आमदारांना महोदयांना देखील पाठवण्यात आला होती.