भाजपचे मेळावे मैदानात तर पडझडीमुळे राष्ट्रवादीच्या सभा सभागृहात : दानवे
By अोंकार करंबेळकर | Published: September 24, 2019 11:30 AM2019-09-24T11:30:13+5:302019-09-24T11:31:00+5:30
पवारांचा मराठवाडा दौरा पार पडल्यानंतर दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचारसभा मेळावे होत असताना राष्ट्रवादीच्या बंद दाराआड बैठका होत आहेत.
मुंबई - केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या दौऱ्यावर कडाडून टीका केली. पवारांचा महाराष्ट्र दौरा प्रचारासाठी नसून हा पक्षातील पडझड रोखण्यासाठी आणि अस्तित्व टीकून ठेवण्यासाठी असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ दूर कऱण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले असून त्यांना प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यावर आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.
पवारांचा मराठवाडा दौरा पार पडल्यानंतर दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचारसभा मेळावे होत असताना राष्ट्रवादीच्या बंद दाराआड बैठका होत आहेत. आता पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र ते प्रचारासाठी नव्हे तर पक्षातील पडझड रोखण्यासाठी फिरत असल्याचा टोला दानवे यांनी लगावला.
दरम्यान अजुनही युतीत येणाऱ्या नेत्यांचे पक्षप्रवेश थांबलेले नाहीत. भाजप-शिवसेनेचे मेळावे खुल्या मैदानात होत आहे.मात्र राष्ट्रवादीच्या सभा देखील बंद सभागृहात होत असल्याची टीका दानवे यांनी केली. यावर आता राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.