"वसूली सरकारची हार, अखेर 'इगो'ला भक्तांसमोर झुकावे लागले"; भाजपाचा ठाकरे सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 03:53 PM2021-10-06T15:53:13+5:302021-10-06T15:55:02+5:30
BJP Ram Kadam And Thackeray Government : भाजपाने (BJP) आता ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उद्या गुरुवारपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे धार्मिक स्थळे उघडण्याची वाट पाहणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी आता मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारांचा कारभार सांभाळणारे प्रशासनही सज्ज झाले आहे. धार्मिक स्थळांमध्ये जाताना जबाबदारीचा विसर पडता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होण्याकरिता सरकारने काही अटीही घातल्या आहेत. याच दरम्यान भाजपाने (BJP) आता ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे.
"वसूली सरकारची हार, अखेर 'इगो'ला भक्तांसमोर झुकावे लागले" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. भाजपाचे आमदार राम कदम (BJP Ram Kadam) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उद्या आम्ही वाजत गाजत गुलाल उधळत मुंबा देवी मंदिरात जल्लोषात दर्शनासाठी जाणार... सकाळी 11 वाजता ... वसूली सरकारची हार... अखेर इगोला भक्तांसमोर झुकावे लागले. भाजपाच्या निरंतर प्रखर आंदोलनाला यश..." असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उद्या आम्ही वाजत गाजत गुलाल उधळत मुब्बा देवी मंदिरात जल्लोषात दर्शनासाठी जाणार.. सकाळी 11 वाजता .. वसूली सरकारची हार... अखेर इगोला भक्तां समोर झुकावे लागले .भाजपाच्या निरंतर प्रखंर आंदोलनाला यश..
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) October 6, 2021
नवरात्रीच्या काळात मुंबादेवी मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या वतीने ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध केला आहे. ही नोंदणी केल्यानंतर प्राप्त झालेल्या एसएमएसमध्ये उल्लेख असलेल्या दिवशी आणि वेळेतच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. यामध्ये मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल तपासणी तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा वापर आवश्यक आहे. मंदिरात प्रवेशासाठी दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे.
१० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश नाही
सरकारने राज्यातील धार्मिक स्थळांसाठी केलेल्या नियमावलीनुसार ६५ वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेले नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, निर्जंतुकीकरण करणे आवश्यक. कोणत्याही प्रार्थनास्थळामध्ये किती भाविकांना प्रवेश दिला जावा, याचा निर्णय प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापन समिती वा ट्रस्टने घ्यायचा आहे.
मंदिरात दर्शनासाठी क्यूआर कोडची सुविधा
सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना मंदिरात दर्शनासाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध केली आहे. भाविकांसाठी दर गुरुवारी १२ वाजता मंदिराने जारी केलेल्या लिंकवरून किंवा मंदिर न्यासाच्या ॲपवरून क्यूआर कोड डाऊनलोड करता येणार आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून दररोज एका तासाला २५० भाविकांना दर्शन घेता येणार आहे. ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश नाही. मंदिरात भक्तांकडून हार, प्रसाद स्वीकारला जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.