BJP vs Shivsena: संपवून दाखवलं! ; भाजपा आमदाराने फेसबुक पोस्टमधून शिवसेनेला डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 02:40 PM2022-07-10T14:40:54+5:302022-07-10T14:40:54+5:30
राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजपाचे नेतेमंडळी ठाकरे गटावर चांगलेच तुटून पडले आहेत.
BJP vs Shivsena: शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखाली ४० आमदारांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत बंड झाल्यापासून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावला आणि अतिशय बोचऱ्या शब्दांत बंडखोर आमदारांवर टीका केली. संजय राऊत यांनी टीका करताना भाषेतील सभ्यपणा टिकवून ठेवायला हवा, अशी भावना नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर व्यक्त केली. मात्र काही कारणास्तव शिवसेनेतून आमदारांनंतर आता माजी नगरसेवकदेखील शिंदे गटात सामील होत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेच उरतील असा टोला भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला होता. त्यानंतर आता भाजपाचे आमदारा राम कदम यांनी नाव न घेता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून शिवसेनेला ट्रोल केले.
महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या धोरणांवर सातत्याने टीका करणारे भाजपा आमदारा राम कदम यांनी उद्धव ठाकरे व शिवसेना यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मुंबईतील मनपा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला. राम कदम यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. यामध्ये 'संपवून दाखवलं!' इतकाच मजकूर लिहिण्यात आला होता. राम कदम यांच्या या वक्तव्याचा रोख शिवसेनेच्या दिशेने असल्याचे दिसले. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात 'करुन दाखवलं' ही टॅगलाईन वापरली होती. त्याचाच धागा पकडत राम कदम यांनी 'संपवून दाखवलं' असा मजकूर लिहून शिवसेनेला डिवचलं.
दरम्यान, भाजपाचे रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेवर काल तोंडसुख घेतलं. "महाराष्ट्रात सरकार आल्याचा आनंद झाला. पुढील नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका निवडणुका आम्हीच जिंकू. गेल्या वेळी ९२ पैकी ८२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी तर युतीही नव्हती, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आमच्या सोबत आहेत. शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. शिवसेनेचे १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आम्ही जिंकू" असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला होता.