'संजय राऊतांसारखा 'खुशामतगिर' परत होणे नाही कारण...'; भाजपाच्या राम सातपुतेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 12:52 PM2022-01-25T12:52:13+5:302022-01-25T13:10:53+5:30
BJP Ram Satpute And Shivsena Sanjay Raut : भाजपाने राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार राम सातपुते यांनी निशाणा साधला आहे.
मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाजपा हा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते, असा दावा करतानाच अयोध्येच्या राममंदिराचा प्रश्न मोदींनी नाही तर न्यायालयाने सोडविला. त्यामुळेच मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना खासदार केले, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. यानंतर आता भाजपाने राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "संजय राऊत, तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपा आमदार राम सातपुते (BJP Ram Satpute) यांनी निशाणा साधला आहे.
राम सातपुते यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. "जनाब संजय राऊत, तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं, कारण आपल्या सारखा 'खुशामतगिर' परत होणे नाही. कदाचित त्यामुळे आपल्याला 'प्राईड व्ह्युल्यू' काय असते? हे समजण्याची तुमची कुवत नाही. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बांधत असलेलं सेंट्रल व्हिस्टा हे नव संसद भवन असो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असो की काशीचं भव्य दिव्य मंदीर असो. हे सर्व तुमचा जळफळाट करणारच आहे" असं सातपुते यांनी म्हटलं आहे.
"असो, महाराष्ट्रातील समस्यांबद्दलही लिहत चला. वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा टक्का उच्चशिक्षण व संशोधनात वाढावा यासाठी बार्टीसारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु या आघाडी सरकारच्या कामचुकार धोरणामुळे तिचा उद्देशच नष्ट होतोय. यामुळे ५१८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती होऊन वर्ष उलटून गेलं तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेल्या नाहीत. यावर आपण कधी बोलणार की, वंचित नेहमी वंचितच राहिले पाहिजे, हे काँग्रेसचच धोरण आपण राबवणार आहात" असं देखील सातपुते यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी अयोध्येच्या लढ्यातील शिवसेनेचे योगदान ऐतिहासिक कार्य आहे. जेव्हा रामजन्मभूमीचा हा लढा थंड पडला होता, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याने वातावरण परत एकदा जागृत केले आणि सरकारला जाग आणली. त्यामुळे अयोध्येशी आमचा काय संबंध आहे, हे रामाला माहिती आहे. जेव्हा अयोध्येचे आंदोलन झाले तेव्हा कोणताही राजकीय पक्ष नव्हता. आमचे अनेक प्रमुख लोक तेव्हा इथून गेले होते. त्याचे संपूर्ण नियोजन मुंबईतून होत होते. आज कोणी काही म्हणत असले तरी इतिहास आहे. दस्तावेज, रेकॉर्ड्स आहेत. विशेष न्यायालयासमोरील साक्षी-पुरावे आहेत. लालकृष्ण अडवाणींसोबत बाळासाहेब ठाकरे हे त्यातले आरोपी आहेत. मग ते न्यायालय मूर्ख होते का, असा प्रश्नही केला आहे.