“काय विचार, काय भाषा? विजय वडेट्टीवार, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन हातभट्टी विकायचा धंदा टाका”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 02:34 PM2021-09-08T14:34:29+5:302021-09-08T15:22:32+5:30
पडळकर आणि वडेट्टीवार यांच्या वादात आता भाजपा आमदार राम सातपुते यांनीही उडी घेतली आहे.
मुंबई – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप केला होता. त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. वडेट्टीवारांनी गोपीचंद पडळकरांवर टीका करताना एका बापाची औलाद असेल तर माझ्याविरोधातील आरोप सिद्ध करुन दाखव असं आव्हान दिलं होतं. त्याला गोपीचंद पडळकरांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.
पडळकर आणि वडेट्टीवार यांच्या वादात आता भाजपा आमदार राम सातपुते यांनीही उडी घेतली आहे. राम सातपुते(Ram Satpute) यांनी वडेट्टीवारांवर टीका करताना म्हटलंय की, विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आहेत. काय भाषा, काय विचार? वडेट्टीवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन हातभट्टी विकायचा धंदा टाकावा असा टोला सातपुते यांनी वडेट्टीवारांना देत पडळकरांवरील टीकेचा समाचार घेतला आहे.
खंडोबा, बिरोबा माझे मायबाप; तुम्ही खुशाल ५० कोटींचा दावा करा, पडळकरांनी वडेट्टीवारांना पुन्हा डिवचले
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पत्र लिहून त्यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. "मी मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रीमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्कफोर्सचं गठन करण्याची मागणी केल्यानंतर 'निष्क्रीय दिग्गजांच्या मंत्रीमंडळ उपसमिती'मधून एका तरी मंत्र्याला जाग आली बरं आहे. किंबहूना,आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या 'महाज्योतीचे' अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते असं त्यांनी म्हटलं होतं.
तसेच मला आपल्यासारखे दहावी पास असतानासुद्धा उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याकरिता खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त करता आले नसते. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या गोसखुर्द प्रकल्पात कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंड्स्टॅडींग न झाल्याने त्यांच्याविरूद्ध तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता. आपल्यासारख्या दूरदृष्टीने स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये आधी दारूची फॅक्टरी विकत घेऊन मगच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत चंद्रपूरमधूल दारूबंदी उठवता आली नसती. दारूबंदीनंतर २३ लिकर शॅाप्सला भागीदारीने चंद्रपूरला स्थलांतरीत करता आले नसते. नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती. किंबहुना म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेल असं चिमटा पडळकरांनी वडेट्टीवारांना काढला होता.
त्यानंतर वडेट्टीवारांनी पडळकरांवर जोरदार टीकास्त्र सोडत आव्हान दिलं होतं. 'पडळकरांनी पुराव्याअभावी आरोप करू नये. आता ते फक्त कार्यकर्ते राहिले नाहीत, आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करावे. नाही तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन, असा इशारा वडेट्टीवारांनी दिला होता. त्यानंतर पडळकरांनीही राज्यातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या हक्काचे १२५ कोटी रुपये यांना खर्च करता आलेले नाहीत. आता हे माझ्यावर ५० कोटींच्या मानहानीचा दावा करणार आहेत. त्यांनी तो खुशाल करावा. मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. कारण माझी माय आणि बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा आणि आरेवाडीचा बिरोबा आहे असं प्रतिआव्हान दिलं होतं.