Maharashtra Political Crisis: “अमेठीचा करेक्ट कार्यक्रम झालाच आहे, आता टार्गेट शरद पवारांचे बारामती”; भाजपचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 10:08 PM2022-09-03T22:08:47+5:302022-09-03T22:08:58+5:30
Maharashtra Political Crisis: कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे, यादृष्टीने भाजपचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Political Crisis: सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, अनेक केंद्रीयमंत्री कामाला लागले आहेत. भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत बारामतीचा कार्यक्रम हुकला. मात्र, आता पुढील लोकसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू, असा निर्धार भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्यावेळी बारामतीचा कार्यक्रम थोडक्यात हुकला, अमेठीचा कार्यक्रम केलाच आहे, आता टार्गेट बारामती आहे असे भाजप नेते राम शिंदे यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राम शिंदे भाजप कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. मागील दोन महिन्यात कोणाकोणाला नोटीस आल्या यावरून तुम्हाला कळाले असेलच की ही निवडणूक किती सीरियस लढणार आहे की नाही. काहींच्या चेहऱ्याकडे बघितले की लगेच लक्षात येते, नाव घ्यावे लागत नाही, असा खोचक टोलाही राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला.
कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे
कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे. A म्हटले की अमेठी आणि B म्हटले की बारामती. A चा कार्यक्रम २०१९ ला केला. २०१९ ला बारामतीचा कार्यक्रम हुकला. तो आता २०२४ ला करायचा आहे. त्याच्यासाठीच १७ महिने अगोदरच हे नियोजन सुरू आहे. हे नियोजन साधे नसून, या ठिकाणी देशाच्या अर्थमंत्री येणार आहेत. त्या तीन दिवस बारामतीत असणार आहेत. त्यातील एक दिवस इंदापूरला मुक्कामी येणार असल्याने भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे हे लक्षात येते, असे राम शिंदे म्हणाले.
दरम्यान, दिवस बदलतात, पावसाळा झाला की हिवाळा येतो, आपल्याला उन्हाळा होता आता पावसाळा आला आहे. वातावरणात बदल होत असतो. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, असे सूचक विधानही राम शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.