पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही; भाजपचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:35 PM2021-04-06T12:35:38+5:302021-04-06T12:37:42+5:30
Pandharpur ByPoll: पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, असा एल्गार भाजपकडून करण्यात आला आहे.
पंढरपूर: देशभरातील पाच राज्यांमधील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राज्यातही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची (Pandharpur ByPoll) धामधूम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना, प्रचाराचे रणही तापताना दिसत आहे. पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, असा एल्गार भाजपकडून करण्यात आला आहे. (Ranjeet Singh Naik Nimbalkar on Pandharpur ByPoll)
आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि भाजपकडून समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून जशी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा काढून घेतली, तशी पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, असे शड्डू भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeet Singh Naik Nimbalkar) यांनी ठोकला आहे.
पोटनिवडणूक भाजपला बिनविरोध करायची होती
पंढरपूर पोटनिवडणूक भाजपला बिनविरोध करायची होती. त्याबद्दल प्रशांत परिचारक यांनाही कळवण्यात आले होते. राष्ट्रवादीने भारत भालके यांच्या पत्नीला संधी दिली असती, तर भाजपची बिनविरोध निवडणूक करण्याची तयारी होती. परंतु, राष्ट्रवादीला ही भावना कळली नाही, असा आरोप निंबाळकर यांनी केला.
“अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर अजून सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या”
नातवाच्या हट्टापायी आजोबांची निवडणुकीतून माघार
मागील लोकसभा निवडणुकीत शरद पवार पुन्हा माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबातील अनेक व्यक्तींना तिकीट दिले तर चुकीचा संदेश जाईल आणि कार्यकर्ते नाराज होतील, असे मत शरद पवार यांनी त्यावेळी व्यक्त केले. नातवाच्या हट्टापायी पवार आजोबांनी निवडणुकीतून माघार घेतली. परंतु पार्थ यांच्या पदरी यश पडले नाही, असेही निंबाळकर म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”: जयंत पाटील
विरोधकांवर टीकास्त्र
विरोधक पोटनिवडणुकीत मृत्यूचे भांडवल करुन अनुकंपाच्या नावाखाली जागा भरण्यासाठी मतं मागायला येतात, हे साफ चुकीचे आहे. आपल्याला लोकांना न्याय देता आला पाहिजे. लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडता आले पाहिजेत. अनुकंपाखाली जागा भरायला हे काय एसटी महामंडळ नाही, अशी टीका करत मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहोत. पांडुरंग हा गरिबांचा देव आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विठ्ठलभक्त आहेत, असा दावा निंबाळकर यांनी यावेळी केला.