“काँग्रेस अन् NCP शरद पवार गट संपले, आता उद्धवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहणार नाही”: दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 23:55 IST2025-04-06T23:52:48+5:302025-04-06T23:55:42+5:30
BJP Raosaheb Danve News: भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे.

“काँग्रेस अन् NCP शरद पवार गट संपले, आता उद्धवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहणार नाही”: दानवे
BJP Raosaheb Danve News: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. यातच उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर ठाकरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाला जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम, कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात आले. अशाच एका कार्यक्रमात बोलताना भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. एक काळ असा होता की जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार आणि भारतीय जनता पार्टीकडून मी एकटाच आमदार होतो. मात्र, आता काळ असा आहे की, भाजपाचे ३ आमदार आणि शिवसेनेचे २ आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोणी आहे का? अशी विचारणा दानवे यांनी यावेळी बोलताना केली.
आता उद्धवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहणार नाही
एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. पण त्यांच्या वागण्यामुळे आणि व्यवहारामुळे लोक त्यांच्या विचारापासून दूर गेले. त्यामुळे काँग्रेस जवळपास संपुष्टात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्ष संपुष्टात आला आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही, असा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.
दरम्यान, विकास, समृद्धी, लोकहीत हे त्यांचे काम नाही. शिव्या घालणे आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे यांचे काम आहे. म्हणून पक्ष संपत चालला आहे. पुढील निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक , सामाजिक , विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी ३९ वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता, साहेब गेले शिवसेना संपली, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली होती.