'मातोश्री'त ठाकरे-शाहांच्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय घडलं?; भाजपाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:37 AM2022-07-20T11:37:50+5:302022-07-20T11:38:53+5:30
२०१९ च्या निकालानंतर लोकांनी युतीला कौल दिला परंतु मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने दगाफटका केला असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.
मुंबई - राज्यात घडलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार आणि १९ खासदारांपैकी १२ खासदार यांनी वेगळी भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी युती करायला सांगितल्याचा गौप्यस्फोट केला.
आता पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झालेल्या बंद दाराआड चर्चेचा मुद्दा समोर आला आहे. भाजपानं मुख्यमंत्रिपदाचा शब्द पाळला नाही असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेत्यांकडून वारंवार करण्यात येतो. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खुलासा केला आहे. दानवे म्हणाले की, त्यावेळी मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो मला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा फोन आला. आपल्याला शिवसेनेसोबत युतीची चर्चा करायची आहे असं त्यांनी सांगितले. त्यानंतर चर्चेसाठी आम्ही एक टीम तयार केली. या टीममध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजपा नेत्यांचा समावेश होता.
अमित शाह मुंबईत आले तेव्हा शिवसेनेशी काय बोलायचे यावर चर्चा झाली. सर्वकाही ठरवून आम्ही मातोश्रीवर गेलो, तिथे शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. काहीवेळ आमच्यात चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना अपून दोनो जरा अंदर बैठेंगे असं सांगत त्यांना आतल्या खोलीत घेऊन गेले. आम्ही तेव्हा बाहेर बसून होतो असं दानवेंनी सांगितले.
काही वेळाने दोघंही बाहेर आले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊ असं सांगितले. परंतु मुख्यमंत्रिपदाचा विषयच काढला नाही. त्यानंतर ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरेंनी आतल्या खोलीत काय चर्चा झाली हे सांगितले नाही. पण सह्याद्रीवर गेल्यावर अमित शाह यांनी आतल्या खोलीत काय झाले हे सगळं सांगितले. उद्धव ठाकरेंनी जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा विषय काढला होता. परंतु मी त्यांना सांगितले, शिवसेना-भाजपा युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी युती केली. तेव्हाच युतीचा फॉर्म्युला ठरला होता. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे तेव्हाच ठरले होते. या फॉर्म्युल्यात काहीही मोडतोड करायची नाही असं शाह यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं.
मात्र २०१९ च्या निकालानंतर लोकांनी युतीला कौल दिला परंतु मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने दगाफटका केला. ही गोष्ट आमदार-खासदारांनाही आवडली नाही. परंतु केव्हातरी याचा स्फोट होणारच होता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांनी बंड नव्हे तर उठाव केला आहे. शिंदे गटाकडे जास्त आमदार, खासदार आहेत. त्यांचे अधिक प्रबळ आहे असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.