Raosaheb Danve on Shivsena: "शिवसेनेत उद्धव अन् आदित्य ठाकरे - दोनच माणसं शिल्लक राहणार", रावसाहेब दानवेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 04:45 PM2022-07-09T16:45:39+5:302022-07-09T16:46:14+5:30
मुंबई महापालिका भाजपाच जिंकणार असल्याचाही विश्वास
Raosaheb Danve on Shivsena: शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर ४० आमदारांनी भाजपाशी हातमिळवणी करत महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत बंड झाल्यापासून खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे उर्वरित शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच बंडखोरांवरही टीकास्त्र सोडताना दिसत आहे. तशातच शिवसेनेतील अनेक नगरसेवकापासून खासदारापर्यंत सर्व जण शिंदे गटाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, शिवसेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोनच जण शिल्लक राहतील असा खोचक टोला भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
"महाराष्ट्रात सरकार आल्याचा आनंद झाला. पुढील नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका निवडणुका आम्हीच जिंकू. गेल्या वेळी ९२ पैकी ८२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी तर युतीही नव्हती, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आमच्या सोबत आहेत. शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे", अशा शब्दांत रावसाहेब दानवेंनी टोला लगावला.
"शिवसेनेचे १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आम्ही जिंकू. जी राहिली आहे, ती शिवसेना फुटू देऊ नका. येत्या निवडणुकांनंतर राज्याचं चित्र काय होतं बघा. मुंबईसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव अशा सर्वच महत्त्वाच्या महापालिका आम्ही जिंकणार या आम्हाला विश्वास आहे", असेही दानवे म्हणाले.
दरम्यान, दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर, देवेंद्र फडणवीसांनी हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. खरी शिवसेना ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि त्याच शिवसेनेसोबत आम्ही युती केली आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच, उपमुख्यमंत्रीपदाबाबात विचारले असता, मला माझ्या पक्षाने मोठे केले. त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मला संधी दिली. माझ्यासाठी पक्षाचा आदेश हा नेहमीच महत्त्वाचा होता, आहे आणि राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार यशस्वी व्हावे, हाच आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही ते म्हणाले.