भाजपाची जल्लोषाची तयारी!
By admin | Published: May 16, 2014 03:07 AM2014-05-16T03:07:51+5:302014-05-16T03:07:51+5:30
मोदी सरकार येणारच, अशी खूणगाठ बांधत भाजपाने जल्लोषाची तयारी चालविली आहे. ढोल, ताशे, मिठाई आणि फटाक्यांच्या सोबतीने निकाल पाहण्याची सिद्धता भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.
मुंबई : मोदी सरकार येणारच, अशी खूणगाठ बांधत भाजपाने जल्लोषाची तयारी चालविली आहे. ढोल, ताशे, मिठाई आणि फटाक्यांच्या सोबतीने निकाल पाहण्याची सिद्धता भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र, भाजपाचा मित्रपक्ष असणार्या शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीने मात्र निकालाची वाट पाहण्याचे धोरण स्वीकारले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात कोणतीच विशेष तयारी केली नाही. प्रवक्ते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निकाल पाहता यावेत, यासाठी व्यवस्था केली असली तरी भाजपाप्रमाणे निकालापूर्वीच उत्सवी थाट करण्यात येणार नाही. एनडीएच्या बाजूने निकाल लागल्यास शिवसेना भवनातील हलचल वाढण्याची शक्यता आहे. विजय दृष्टिपथात आल्यास शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे दुपारनंतर सेना भवनात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपा सिंधी सेलने बांद्रा येथे मोठ्या एलईडी स्क्रीनवर निकालाच्या प्रक्षेपणाची सोय केली असून, कार्यकर्त्यांच्या ‘पोेटपूजे’चीही व्यवस्था केली आहे. मोदींच्या विजयाने रामराज्य येणार असून उत्तर भारतीय जनतेने घरात दिवाळीप्रमाणे उत्सव करावा, असे आवाहन भाजपा उत्तर भारतीय मोर्चाने केले आहे. अल्पसंख्याक सेलच्या वतीने माहीम दर्ग्यावर चादर चढवण्यात येणार असून, मिठाईदेखील वाटली जाणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयांवर तर एक्झिट पोलच्या अंदाजाचे सावट दिसत आहे.