हेमंत करकरेंच्या बलिदानाबद्दल भाजपाला आदरच : विनय सहस्त्रबुध्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 07:36 PM2019-04-19T19:36:38+5:302019-04-19T20:27:13+5:30
आपल्या शापामुळेच करकरे यांना शिक्षा झाली या प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध होतो आहे...
पुणे: भोपाळमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार प्रज्ञासिंह यांनी शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्धल व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाला करकरे यांच्या बलिदानाबद्दल आदरच असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व पक्षाचे मध्यप्रदेशचे प्रभारी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले. त्या काय म्हणाल्या ते आपण ऐकलेले नाही अशी पुस्तीही त्यांनी नंतर जोडली.
आपल्या शापामुळेच करकरे यांना शिक्षा झाली या प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात आलेल्या सहस्रबुद्धे यांना विचारले असता त्यांनी ते मत प्रज्ञासिंह यांचे वैयक्तिक मत आहे अशी पळवाट काढली. त्यावेळी झालेल्या त्रासाच्या उद्वेगातून कदाचित त्या तसे म्हणाल्या असाव्यात, त्या काय म्हणाल्या ते आपण ऐकले नाही, मात्र पक्षाला करकरे यांच्याबद्धल आदरच आहे, पक्ष त्यांच्या बलिदानाचा सन्मानच करतो असे ते म्हणाले.
भाजपा शिवसेना महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी म्हणून सहस्रबुद्धे पुण्यात आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, जबाबदारीचे भान, परिणामकारक शासनाचा अनुभव, योजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षण, सामाजिक न्याय, सरकार व नागरिकांमधील समन्वय यामुळे भाजप महायुतीला भक्कम जनादेश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यावेळी उपस्थित होते.
सहस्रबुद्धे म्हणाले, भाजपाने या निवडणूकीत कुठेही हिंदुत्व हा मुद्दा वापरलेला नाही, तो आमचा विचार आहेच, पण गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवरच मोदी यांच्यापासून सर्वजण बोलत आहेत. जनादेश मागत आहेत. मागील निवडणूकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केल्याचे सांगत आहोत, त्यातील सुरू असलेल्या गोष्टींना पुर्णत्व देण्यासाठी म्हणून पुन्हा मतांची मागणी करत आहोत. देशातील अनेक राज्यात केलेल्या दौऱ्यानंतर सर्वत्र मोदी यांच्याविषयी जनतेमध्ये असलेला विश्वास दिसला आहे. त्यामुळेच विजय भाजपाच्या दृष्टीपथात आहे.