ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीतूनही भाजपाची माघार
By Admin | Published: March 6, 2017 09:27 AM2017-03-06T09:27:37+5:302017-03-06T09:30:16+5:30
मुंबई मनपा महापौर निवडणुकीपाठोपाठ भाजपा ठाण्यातही महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेणार आहे. त्यामुळे ठाण्यातही शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 6 - मुंबई मनपा महापौर निवडणुकीपाठोपाठ भाजपा ठाण्यातही महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेणार आहे. त्यामुळे ठाण्यातही शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे ठाणे भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले. मात्र, निवडणुकीत भाजपाची भूमिका काय असणार आहे, याबाबतची माहिती अजूनही अस्पष्ट आहे.
ठाण्याच्या महापौरपदासाठी आज निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदासाठी रमाकांत मढवी यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून आशा सिंह आणि मुकेश मोकाशी यांनी अर्ज भरला होता, मात्र आता तो मागे घेण्यात येणार आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.