मेट्रोवरून भाजपाचे घूमजाव

By Admin | Published: May 27, 2015 12:56 AM2015-05-27T00:56:32+5:302015-05-27T00:56:32+5:30

केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर चार दिवसांत पुणे मेट्रोला मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते.

BJP roams on the metro | मेट्रोवरून भाजपाचे घूमजाव

मेट्रोवरून भाजपाचे घूमजाव

googlenewsNext

पुणे : केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर चार दिवसांत पुणे मेट्रोला मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पुण्यामागून नागपूर मेट्रोला मान्यता देण्यात आली. पुणे मेट्रोच्या आश्वासनाला आठ महिने झाले तरी मंजुरीचा पत्ता नाही. आता पुन्हा एकदा व्यंकय्या नायडू यांनी प्रस्तावातील त्रुटी दूर झाल्यास लवकरच मान्यता देण्याचे आश्वासन देऊन घूमजाव केले.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते चिंचवड अशा दोन मेट्रो मार्गांचा आराखडा दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने महापालिकेला २००९ मध्ये सादर केला. त्यावर महापालिकेने दोन्ही मार्गांना मान्यता देऊन प्रस्ताव राज्य व केंद्र शासनाला पाठविला होता. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पांना तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र, पुढे काही झाले नाही. दरम्यान, केंद्रात सत्तापालट होऊन भाजपाचे सरकार सत्तेत आले. त्या वेळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने आलेल्या व्यंकय्या नायडू यांनी राज्यात सत्तेत आल्यानंतर चार दिवसांत पुणे मेट्रोला मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पूर्वीच्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे.
त्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘‘नागपूर आणि पुणे मेट्रोचा प्रस्ताव एका वेळी आला हे खरे आहे. मात्र, प्रस्तावामध्ये तांत्रिक अडचणी होत्या. त्यानंतर नागपूर मेट्रोचा सुधारित प्रस्ताव तातडीने पाठविण्यात आल्याने त्याला मंजुरी मिळाली आहे.
पुण्याचा सुधारित अहवाल राज्य शासनाकडून केंद्राला मिळाल्यानंतर लवकरच मंजुरी देण्यात येईल. मात्र, नक्की कधी मंजुरी मिळणार हे सांगता येणार नाही. मात्र, पुणे मेट्रोसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्थानिक खासदार अनिल शिरोळे यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे.’’
(प्रतिनिधी)

शहरातील वनाज ते रामवाडी या वादग्रस्त मेट्रो प्रकल्पासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर करून एक महिना होऊन गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांंनी तातडीने अहवालावर निर्णय घेऊन मेट्रोचा विषय मार्गी लावावा, असे स्मरणपत्र महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पाठविले आहे.

व्यंकय्या नायडू यांना साकडे...
केंद्र शासनाकडून पुणे मेट्रोला अंतिम मंजुरी तातडीने देण्याविषयीचे निवेदन महापौर दत्तात्रय धनकवडे आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांना सादर केले. पुणे शहराच्या रखडलेल्या प्रकल्पांचा निधी आणि स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचा समावेश करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे, असे महापौर धनकवडे यांनी सांगितले.

Web Title: BJP roams on the metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.