आयारामांविरुद्ध भाजपात रोष
By admin | Published: September 7, 2014 01:58 AM2014-09-07T01:58:47+5:302014-09-07T01:58:47+5:30
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यापैकी एकाचेही नाव शहा यांना माहीत नाही.
Next
अतुल कुलकर्णी - मुंबई
राष्ट्रवादी पक्षातून भाजपात आलेल्यांची चार चांगली कामे आम्हाला सांगा म्हणजे आम्ही ती जनतेला सांगून या नेत्यांसाठी मतं मागू, अशी तिरकस मागणी आता आयारामांच्या मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते करीत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यापैकी एकाचेही नाव शहा यांना माहीत नाही. यावरून त्यांची लोकप्रियता किती आहे हे दिसून येते.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनीही राष्ट्रवादीतून भाजपात आलेले दोषी आढळतील तर त्यांना पक्षातून काढून टाकू, असे सांगितले. त्यामुळे आगीतून उठून फुफाटय़ात आल्याची अवस्था झाल्याची भावना कार्यकत्र्यामध्ये आहे. एवढे दिवस ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही भाषणं केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून आम्ही कसे काय बसायचे, असा सवाल भाजपा कार्यकर्ते करीत आहेत. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांच्या विरोधात तर अधिक रोष आहे. आदिवासी विकास मंत्री असताना त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले होते. भाजपाच्या आमदारांनीच ज्यांच्याविरोधात लक्ष्यवेधी मांडल्या, आज त्यांच्यावरच त्यांचा प्रचार करण्याची पाळी आली आहे. आजवर ज्यांच्या मतदारसंघात विरोधात प्रचार केला त्यांच्या कामगिरीचे कौतुक आम्ही कसे करणार, असा सवाल भाजपाचे निष्ठावंत विचारत आहेत.
भास्करराव पाटील खतगावकर यांना भाजपात घेतले खरे, परंतु नांदेडची जिल्हा बँक
कोणामुळे बुडाली? चौकशीचा अहवाल सरकारने अजूनही बाहेर काढलेला नाही, मात्र भाजपाचे सरकार सत्तेवर आले तर हा अहवाल जनतेसमोर येणार आहे का, असे प्रश्न नांदेडमधील कार्यकर्ते नेत्यांना विचारत आहेत.