विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपची धावपळ सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 06:54 AM2020-03-04T06:54:46+5:302020-03-04T06:55:07+5:30
विनोद मिश्रा यांच्याऐवजी आता प्रभाकर शिंदे यांचे नाव गटनेते पदासाठी निश्चित करण्यात आले आहे.
मुंबई : गटनेता जाहीर होण्याआधी विरोधी पक्षनेतेपदाच्या तयारीला लागलेल्या भाजपला कोंडीत पकडण्याचे मनसुबे
शिवसेना आणि काँग्रेसने आखले होते. मात्र आपली चूक लक्षात येताच आठवडाभरात गटनेता बदलण्याची वेळ पहारेकऱ्यांवर आली आहे. विनोद मिश्रा यांच्याऐवजी आता प्रभाकर शिंदे यांचे नाव गटनेते पदासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारच्या महासभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे.
२०१७च्या पालिका निवडणुकीत ८३ संख्याबळ मिळवून भाजप दुसरा मोठा पक्ष ठरला. सत्तेच्या रस्सीखेचात शिवसेनेने बाजी मारल्यानंतर भाजपने पहारेकऱ्यांची भूमिका स्वीकारली. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी आणि महापालिकेतील विरोधी पक्षाने भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली. २०२२ मध्ये भाजप पूर्णशक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. त्यामुळे या काळात आक्रमकता कायम ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदावर भाजपने दावा केला आहे. त्यानुसार भाजपचे नवीन गटनेते म्हणून नगरसेवक विनोद मिश्रा यांची निवड
करण्यात आली. मात्र याप्रकरणी महासभेत घोषणा करण्याबाबत महापौरांना सूचित न करता विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रभाकर शिंदे यांचे नाव जाहीर करण्याबाबत भाजपने महापौरांना पत्र पाठवले. निर्माण झालेल्या या तांत्रिक अडचणीवर बोट ठेवून भाजपला मात देण्याचे मनसुबे शिवसेना आणि काँग्रेसने आखले होते. मात्र ते अचूक हेरत या दोन्ही पक्षांना शह देण्यासाठी भाजपने मंगळवारी तडकाफडकी प्रभाकर शिंदे यांना पक्षाचे गटनेते म्हणून जाहीर करण्याची
विनंती केली आहे.
विशेष म्हणजे, यासंदर्भातील पत्र भाजपकडून २७ फेब्रुवारी या जुन्या तारखेने पाठविण्यात आले आहे. यामुळे शिवसेना आता काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले
>निकाल गुरुवारी
भाजप दुसरा मोठा पक्ष असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचा दावा योग्य ठरतो. मात्र विरोधी पक्षनेतेपद सध्या काँग्रेसकडे आहे. त्यामुळे येत्या गुरुवारच्या मुंबई महापालिकेच्या महासभेत शिवसेना यासंदर्भात नेमकी कोणती
भूमिका घेणार? याविषयी पालिका वर्तुळात उत्सुकता आहे.
>काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात
काँग्रेस पक्षाकडे २८ एवढे कमी संख्याबळ आहे. तरीही भाजपने हक्क सोडल्यामुळे काँग्रेसला मुंबई महापालिकेतील मोठ्या पदांपैकी एक असलेले विरोधी पक्षनेतेपद मिळवता आले. गेली दोन वर्षे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवि राजा या पदावर विराजमान आहेत. मात्र भाजपच्या दाव्यामुळे हे महत्त्वाचे पद हातून निसटण्याची धास्ती काँग्रेसला लागली आहे.