शहिदांच्या बलिदानाचे भाजपा भांडवल करतेय; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 05:48 AM2019-03-12T05:48:44+5:302019-03-12T05:49:08+5:30

सरकार शहिदांच्या नावाने राजकारण करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

BJP is sacrificing martyrdom; Sharad Pawar's criticism | शहिदांच्या बलिदानाचे भाजपा भांडवल करतेय; शरद पवार यांची टीका

शहिदांच्या बलिदानाचे भाजपा भांडवल करतेय; शरद पवार यांची टीका

googlenewsNext

कळंबोली : देशासाठी शहीद झालेल्या सैन्यातील जवानांचे भारतीय जनता पार्टी भांडवल करीत आहे. हे माझे नाही, तर सैनिकांच्या वीरपत्नींची म्हणणे आहे. आम्हाला काही नको, पण राजकारण करू नका, असे त्या भगिनी सांगतात. तरीही सरकार शहिदांच्या नावाने राजकारण करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

कळंबोलीत न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात सोमवारी माढा लोकसभा मतदारसंघाचा मेळावा पार पडला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार बाळाराम पाटील, माजी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे, आमदार बाळाराम पाटील, गुलाबराव जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

भाजपाने धनगर, मराठा समाजाला फसविले आहे. त्यांच्या पदरात निराशेशिवाय दुसरे काहीच पडले नसल्याचे पवार म्हणाले. माथाडी कामगारांची चळवळ हे सरकार संपवायला पाहत आहे. त्यामुळे भाजपाच्या कामगार, शेतकरी धोरणाविरोधात सर्वांनी उभे राहिले पाहिजे. या देशात अनेकांनी राज्य केले. त्यामध्ये मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही यांच्यासह कित्येकांचा समावेश होता. मात्र छत्रपती असे एकमेव राजे होते की त्यांनी कधीच भोसलेंचे राज्य असे म्हटले नाही; तर रयतेचे हे राज्य आहे, असा उल्लेख केला.
नोटाबंदीने सर्वसामान्यांचे हाल केले. मात्र एक काळा पैसाही आणला नसल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या काळात राफेल विमानाचा निर्णय घेतला तेव्हा ते ३५० कोटींचे होते. आज ते विमान भाजपा सरकारने १६६० कोटींवर नेले आहे. ‘न खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्यांनीच त्यावर डल्ला मारल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

प्रत्येक शहराचा कणा म्हणजे माथाडी कामगार आहे. त्याने काम बंद केले तर सर्वच ठप्प होईल. नुकसान किती याची गणतीच करता येणार नाही. माथाडी कायदा बदलण्याचे सोडा; साधा विचार झाला तरी बलिदान करण्याकरिता मी पुढे असेल, असे उदयनराजे भोसले या वेळी म्हणाले. शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली म्हणजे आमचा विजय झाला, असे कोणी म्हणत असेल तर माढा सोडा कोणत्याही मतदारसंघात ते उभे राहिले तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असेही उदयनराजे म्हणाले. या वेळी शशिकांत शिंदे, बाळाराम पाटील, गुलाबराव जगताप आणि दीपक साळुंखे, प्रभाकर देशमुख यांचीही भाषणे झाले.

संवाद मेळावा ‘माढा’चा की ‘म्हाडा’चा?
कळंबोली येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात सोमवारी सायंकाळी माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र आयोजकांनी स्टेजवरील बॅनरवर ‘माढा’ऐवजी ‘म्हाडा’ असा उल्लेख केला होता. गेल्या काही दिवसांपासून हा मतदारसंघ गाजत असताना म्हाडा असा उल्लेख केल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू होती.

माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला, करमाळा, माळशिरस, माढा, माण, फलटण येथील अनेक नागरिक पनवेल, नवी मुंबई, मुंबईत नोकरी- व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. माढा मतदारसंघातून राष्टÑवादीचे प्रमुख शरद पवार उभे राहणार होते. परंतु त्यांनी सोमवारी माढामधून निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. त्यामुळे माढा मतदारसंघातून आता कुणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मागील आठवड्यात मुंबईतील मतदार, कार्यकर्ते आणि माथाडी कामगारांचा संवाद मेळावा घेण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप यांनी कळंबोलीत सोमवारी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. येथे शिंदे आणि जगताप यांनी भाषणबाजी करीत शरद पवार यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टेजवरील बॅनरवर ‘माढा’ऐवजी ‘म्हाडा’ असा जो उल्लेख करण्यात आला होता, ते त्यांच्या लक्षातही आले नाही. या मेळाव्यासाठी गुलाबराव जगताप दोन दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून होते. मात्र, तरीही मतदारसंघाचे नाव चुकल्याने उपस्थितांत चर्चा सुरू होती.

Web Title: BJP is sacrificing martyrdom; Sharad Pawar's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.