उल्हासनगरात भाजपा-साई पक्षाची युती

By admin | Published: February 25, 2017 05:12 AM2017-02-25T05:12:41+5:302017-02-25T05:12:41+5:30

उल्हासनगर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा आणि साई पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली

BJP-Sai Party alliance in Ulhasnagar | उल्हासनगरात भाजपा-साई पक्षाची युती

उल्हासनगरात भाजपा-साई पक्षाची युती

Next

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा आणि साई पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत या नव्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या शहरातील राजकीय अनिश्चितता संपुष्टात आली आहे. मात्र आजवर राजकीय वैर असलेले कलानी-ईदनानी यानिमित्ताने सत्तेसाठी एकत्र येणार आहेत.
उल्हासनगरच्या विकासासाठी आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे साई पक्षाचे प्रमुख जीवन ईदनानी यांनी सांगितले. मुख्यमंत्री, चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचा तपशील त्यांनी पुरवला. या सत्तेत कोणाचा किती वाटा असेल, महापौरपदाची विभागणी कशी असेल, अन्य समित्यांचे वाटप कसे होईल याचे सूत्र अजून ठरलेले नाही, असे ते म्हणाले.
उल्हासनगरच्या ७८ सदस्यांपैकी ३२ जागांवर भाजपा-ओमी टीम, २५ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. साई पक्ष ११ जागांवर विजयी झाला होता. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने या त्रिशंकू स्थितीत शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येतील, अशी स्थिती होती. मात्र तोवर भाजपा आणि साई पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
साई पक्षाला शिवसेनेनेही पाठिंब्यासाठी गळ घातली होती. मात्र भाजपाने घाई करत त्या पक्षाला आपल्या गटात ओढून घेतले. एका एका छोट्या पक्षाची मोट बांधण्यापेक्षा भाजपाने आपले ३२ सदस्य, राष्ट्रीय समाज पक्षाचा १, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा १ अशा ३४ सदस्यांसोबत साई पक्षाला घेतल्याने त्यांची सदस्यसंख्या ४५ वर गेली आहे.
भाजपावर नाराज होऊन शिवसेनेसोबत गेलेल्या रिपब्लिकन पक्षाला चुचकारण्याचे प्रयत्नही भाजपाने केले होते. तोवर साई पक्षासोबतच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या.
उल्हासनगरात ५ एप्रिलपूर्वी नव्या महापौरांची निवड होणे अपेक्षित असल्याने पुढील महिन्यात भाजपा-साई पक्षाची सत्ता अस्तित्वात येईल, असे मानले जाते.

Web Title: BJP-Sai Party alliance in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.