राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला भाजपा-सेनेत तणाव कायम; दोन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 11:39 PM2019-10-28T23:39:21+5:302019-10-29T06:32:52+5:30

मुख्यमंत्री फडणवीस, रावते राज्यपालांना भेटले, उद्या निवडणार भाजपा विधिमंडळ पक्षनेता

BJP-Sena tensions in Yuti on Chief Minister Post | राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला भाजपा-सेनेत तणाव कायम; दोन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटले

राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला भाजपा-सेनेत तणाव कायम; दोन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटले

Next

मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात ‘सत्तासंघर्ष’ सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी सोमवारी सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तत्पूर्वी ‘५०-५० फॉर्म्युल्या’वर भाजपाने सत्य बोलावे, असे आवाहन शिवसेनेने केले. दरम्यान, शिवसेना आपल्या मुखपत्रातून करीत असलेली टीका थांबवणार नाही तोपर्यंत या पक्षासोबत चर्चा नाहीच, अशी ठाम भूमिका भाजपाने घेतली आहे. नवा नेता निवडण्यासाठी ३० ऑक्टोबरला भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.

तथापि दोन्ही नेत्यांची ही भेट केवळ ‘औपचारिक भेट’ होती, असे राजभवनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. फडणवीस आणि रावते राज्यपालांशी वेगवेगळे भेटले. फडणवीस सकाळी ११ वाजता राजभवन येथे पोहोचले. त्यानंतर रावते राजभवनवर आले.
२८८ सदस्यीय विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाला १०५ व शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला, तर राष्ट्रवादीने ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत.

पूर्ण बहुमतासह स्वबळावर सरकार स्थापण्याचे भाजपाचे लक्ष्य होते. परंतु १०५ जागा जिंकता आल्याने भाजपाला मोठा हादरा बसला. निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेचे मनोबल उंचावले आणि आणि त्यामुळेच शिवसेना आता ‘५०-५० फॉर्म्युला’ अमलात आणण्यावर जोर देत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि फडणवीस यांच्यासोबत झालेल्या आपल्या बैठकीत ५०-५० फॉर्म्युला ठरला होता. त्यावर आता अमल करण्यात यावा, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे.

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याआधी ‘सत्तेत समसमान वाटा’ ठेवण्याचे लेखी आश्वासन भाजपाने द्यावे, अशी मागणी शिवसेनेने शनिवारीच केली होती. तत्पूर्वी आर्थिक मंदीवरून शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर प्रखर टीका केली. ‘इतना सन्नाटा क्यो है भाई?’, असे म्हणत शिवसेनेने भारतीय बाजारपेठेतील मंदीवर भाष्य केले. शिवसेनेच्या मुखपत्रातील हा लेख आणि खा. राऊत यांचे भाष्य यामुळे अमित शहा यांच्या मुंबई भेटीपूर्वीच भाजपा-शिवसेनेत कटुता निर्माण झाली आहे, असे मत एका भाजपा नेत्याने व्यक्त केले.

खरे बोला-राऊत
सत्तेत समान वाटा देण्याच्या मागणीचा शिवसेनेने सोमवारी पुनरुच्चार केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या ‘५०-५० फार्म्युल्या’बद्दल भाजपाने खरे सांगावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. रावते राज्यपाल कोश्यारी यांना भेटले. पण या भेटीत राजकीय असे काही नाही, असे राऊत म्हणाले. सत्तेत समान वाटा देण्यास भाजपाने नकार दिला तर काय होईल, असे विचारले असता राऊत म्हणाले,‘भाजपाने रामाच्या नावावर मते मागितली. आता तुम्ही (भाजपा) राममंदिरही बांधणार आहात. राम ‘सत्यवचनी’ होता. त्यामुळे भाजपाने आता यावर (५०-५० फॉर्म्युला) खरे बोलले पाहिजे. तुम्हाला कागद फाडता येईल; पण रेकॉर्ड (भाजपा-शिवसेनेत झालेला समान सत्ता वाटपाचा करार) डिलिट करता येणार नाही.

Web Title: BJP-Sena tensions in Yuti on Chief Minister Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.