भाजपा अनोख्या पद्धतीनं निषेध करणार; शरद पवारांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रं पाठवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 04:37 PM2020-07-22T16:37:50+5:302020-07-22T16:46:56+5:30
शरद पवार यांच्या राम मंदिराबद्दलचा विधानाचा भाजपा अनोख्या पद्धतीनं अनोखा निषेध
पनवेल : अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचा शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. यानंतर आता भाजपा युवा मोर्चाकडून शरद पवारांचा अनोखा निषेध केला जात आहे. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पवारांना जय श्री राम लिहिलेली 10 लाख पत्र त्यांच्या मुंबईस्थित सिल्वर ओक निवासस्थानी पाठवणार असल्याची माहिती भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मोठ्या संख्येने पत्र जमा करत आहेत. स्वतः प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यांच्याकडे जमा झालेली पत्रे पनवेल येथे पोस्ट ऑफिसमध्ये यावेळी जमा केली.
याविषयी माहिती देताना विक्रांत पाटील यांनी सांगितले की, शरद पवार हे मोठे सन्माननीय नेते आहेत. परंतु प्रभू रामचंद्राच्या विषयात असे नकारात्मक कोणी बोलणार असेल, तर प्रभू रामाची आठवण करून देण्याचे काम नेहमीच भारतीय जनता युवा मोर्चा करत राहील. कोरोना महामारी विषयांमध्ये केंद्रातील सरकार उचित कार्यवाही करत आहे व संपूर्ण देशात योग्य दिशेने काम सुरू आहे. इतर सर्व राज्यही चांगले काम करत आहेत. परंतु या बाबतीत महाराष्ट्रात मात्र कोठेही सुसूत्रता दिसत नाही. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आघाडी सरकारमधील तीनही पक्षात बिलकुल समन्वय नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भरडली जात आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
राम मंदिर बांधल्याने कोरोना जात नाही, असे शरद पवार म्हणतात. तर मग ज्यामुळे कोरोना जातो अशा किमान चार गोष्टी शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारची शिकवणी घेऊन त्यांना शिकवाव्यात. म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण होईल असा खोटक टोला त्यांनी लगावला. आज आणि उद्या महाराष्ट्रभरात भाजयुमोचे अनेक कार्यकर्ते तथा असंख्य नागरिक ठिकाणी जय श्रीराम लिहिलेली पत्र माननीय शरद पवार यांना पाठवून निषेध व्यक्त करतील असे त्यांनी सांगितले.