भाजप कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ‘जय श्रीराम’ लिहिलेले 5 हजार पोस्टकार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:37 PM2019-06-19T15:37:31+5:302019-06-19T16:11:59+5:30
अमरावतीचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा अभियान सुरु केले आहे.
अमरावती - जय श्रीरामाच्या घोषणा देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही. त्याचासाठी मंदिरं आहेत. अशी भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे . अमरावती जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ लिहिलेली पोस्टकार्ड राणा यांना पाठवणार आहेत. त्यामुळे ‘जय श्रीराम’ या वाक्यावरुन देशात राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे.
संसदेत भाजप खासदारांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने, यावर खासदार नवनीत राणा यांनी आक्षेप घेतला होता. जय श्रीरामाच्या घोषणा संसदेत देऊ नका, त्यासाठी मंदिर आहेत. सगळे देव एकच आहेत यावर माझा विश्वास आहे. मात्र जय श्रीराम अशा घोषणा संसदेत देणं योग्य नसल्याची भूमिका राणा यांनी घेतली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्धार केला असून, यातील शेकडो पोस्टकार्ड आतापर्यंत पाठवण्यात आली आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे.
अमरावतीचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा अभियान सुरु केले आहे. तर, भारतातील बहुसंख्य नागरिकांचे श्रद्धास्थान श्रीराम आहेत, त्यांच्या उच्चाराने खासदार नवनीत राणा यांना कसला त्रास झाला? हे नवनीत राणांनी स्पष्ट करावं, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून त्या चांगल्याच भडकल्याचं व्हिडिओ वायरल झाल होता. त्यानंतर, भाजपने ममतांना ‘जय श्रीराम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला होता.