Madhukar Pichad Passed Away: भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:13 IST2024-12-06T19:10:40+5:302024-12-06T19:13:24+5:30
Madhukar Pichad Passed Away : ब्रेनस्ट्रोक आल्याने मागील दीड महिन्यांपासून पिचड यांच्यावर रुग्णालयात सुरू होते उपचार

Madhukar Pichad Passed Away: भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
Madhukar Pichad Passed Away : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे आज वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज पिचड यांची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मधुकर पिचड यांनी मुलगा वैभव पिचड याच्यासह २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता.
ज्येष्ठ नेते स्व. मधुकरराव पिचड
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 6, 2024
यांना भावपूर्ण आदरांजली !
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातील एक बुजूर्ग नाव मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
स्व. पिचड यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली. त्यातील आदिवासी… pic.twitter.com/nQSSGgYDsD
महाराष्ट्राच्या राजकारणात मधुकर पिचड यांचे नाव आदराने घेतले जाते. मधुकर पिचड यांनी कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली. त्यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही भुषवले होते. त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला. अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून त्यांनी १९७२ साली राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९७२ ते १९८० या काळात ते पंचायत समितीवर सभापती म्हणून कार्यरत होते. १९८० पासून २००९ पर्यंत सलग ७ वेळा ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले.
भावपूर्ण श्रद्धांजली
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) December 6, 2024
आमच्या संगमनेर-अकोले तालुक्याचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना आमच्या भागाच्या विकासासाठी पिचड साहेबांच्या योगदानाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
विशेषतः संगमनेर-अकोले तालुक्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी… pic.twitter.com/2jGeC5a6UN
२०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिचड यांनी आपल्या मुलासह प्रवेश केला होता. पण, त्या निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला. त्यानंतर पिचड यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे घरवापसीची चर्चा रंगली होती. पण, त्यानंतर मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज संध्याकाळी त्यांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.