भाजप-शिंदे-मनसे महायुती? भाजप-शिंदेंची राज ठाकरेंशी जवळीक वाढली; नेत्यांमध्ये नव्याने चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:01 AM2022-10-25T11:01:10+5:302022-10-25T11:01:49+5:30
शिंदे, फडणवीस यांनी मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला हजेरी लावली.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी वाढलेली जवळीक पाहता भाजप शिंदे - राज अशी युती मुंबई व अन्य महापालिका निवडणुकीत होणार का अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. त्यातच भविष्यात काहीही घड्डू शकते असे भाजपचे ज्येष्ठ नेते सांगत असल्याने चर्चेला खतपाणी मिळत आहे.
शिंदे, फडणवीस यांनी मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला हजेरी लावली. यावेळी दोन्ही नेते राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले, तेथे गप्पाही केल्या. त्याच्या काही दिवस आधीच राज ठाकरे यांनी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक भाजपने लढवू नये असे आवाहन केले आणि त्याला भाजपने माघार घेत सकारात्मक प्रतिसाददेखील दिला.
माघार घ्यायचीच होती; पण त्यासाठी राज यांचा उपयोग भाजपने करवून घेतला अशीही चर्चा आहे. शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटी अलीकडे वाढल्या आहेत. या शिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते अधूनमधून राज ठाकरे यांना भेटत आहेत.
भाजपसमोर दोन्ही पर्याय खुले
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने जबरदस्त एकी दाखविली, हीच एकी महापालिका निवडणुकीतही कायम राहिली तर मनसेशी युती करण्याबाबत भाजपला विचार १ करावा लागेल, असे मत मनसेच्या एका नेत्याने 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. मनसेला सोबत घेण्याविषयी तूर्त कोणतीही ठोस भूमिका जाहीर करायची नाही पण दोन्ही पर्याय खुले ठेवायचे अशी भूमिका भाजपने घेतली आहे. भविष्यात काहीही होऊ शकते, आज काही सांगता येणार नाही' हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान त्या दृष्टीने सूचक आहे."
डिसेंबर अखेरीस निर्णय शक्य
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक ही जानेवारी, फेब्रुवारी २०२३ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्या आधी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका होतील असा अंदाज आहे. मनसेशी युतीचा विषय हा मुख्यत्वे महापालिका निवडणुकीशी संबंध असल्याने त्याबाबतचा अंतिम निर्णय डिसेंबरच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
दीपोत्सवाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री शिदे गेले तेव्हा त्यांनी, 'दहा वर्षापासूनच येथे येण्याची इच्छा होती, पण येता आले नाही असे विधान केले. राज ठाकरे यांच्याविषयी अविभाजित शिवसेनेत असतानाही आपुलकी होती असे त्यांनी या विधानाने सूचित केले होते.
उद्धवना शह देण्यासाठी राज यांनापाठबळ
१. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मात द्यायची तर शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे सोबत असावी असे मानणारे भाजपमध्ये काही नेते आहेत. दुसरीकडे राज यांना सोबत घेऊन अधिक फायदा होईल की ते विरोधात लढले तर अधिक फायदा होईल याचा नीट अभ्यास करूनच निर्णय घ्यावा असे काही नेत्यांना वाटते.
२. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या वतीने सातत्याने खासगी कंपन्यांकडून सर्वेक्षणे केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसे वेगळी लढल्यास होणारे मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडेल की शिवसेनेच्या याचाही अभ्यास केला जात आहे.
मुंबईत एकत्र, इतरत्र स्वतंत्र?
१. मनसेला मुंबईत सोबत घ्यावे आणि ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ते वेगळे लढले तरी चालेल अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी आणि विशेषतः पक्षसंघटनेत काम करणाऱ्यांनी पक्षाकडे मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यास विरोध दर्शविला आहे.
२. राज ठाकरे हे गर्दी खेचणारे नेते आहेत. फक्त मुंबईत युती केली तर मुंबईच्या प्रचारात ते भाजपचे कौतुक करतील आणि अन्यत्र युती नसेल तर जोरदार टीका करतील. त्यामुळे विसंवादाचे चित्र निर्माण होईल. तसेच राज ठाकरेदेखील युतीचा असा प्रस्ताव मान्य करणार नाहीत असे या वरिष्ठ नेत्यांना वाटते.