भाजपा-शिवसेनेमुळे राज्याचा विकास खुंटला
By Admin | Published: July 10, 2017 03:00 AM2017-07-10T03:00:55+5:302017-07-10T03:00:55+5:30
केंद्रातील भाजपाने जीएसटी ही नवी करप्रणाली आणली;
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : केंद्रातील भाजपाने जीएसटी ही नवी करप्रणाली आणली; परंतु त्यामुळे महागाई वाढली आहे. लहान-मोठ्या व्यापाऱ्यांत याविषयी असंतोष आहे. गुजरातमध्ये तर जीएसटीच्या विरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वादामुळे राज्याचा विकास खुंटला आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री गणेश नाईक, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी झटकन निर्णय घेऊन शेतकऱ्यांची कर्जे माफ केली; परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अजूनही विचार करीत असल्याची टीका पवार यांनी केली. नोटाबंदीनंतर देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्या या सरकारला घरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनाची मुहूर्तमेढ नवी मुंबईतूनच होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गणेश नाईक यांची भाषणे झाली. तर मेळाव्याचे निमंत्रक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्याला महापौर सुधाकर सोनावणे, पक्षाचे जिल्हा निरीक्षक मुनाफ हकीम, आमदार शशिकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयदीप गायकवाड, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, महिला अध्यक्षा माधुरी सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सूरज पाटील, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष दिनेश पारेख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.