उल्हासनगर: स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप, शिवसेनेकडून अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 07:21 PM2021-06-14T19:21:08+5:302021-06-14T19:22:51+5:30
महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदासाठी बुधवारी निवडणूक होणार असून स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून दीपक सिरवानी तर शिवसेनेकडून कलवंतसिंग सोहतो यांनी अर्ज दाखल केले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदासाठी बुधवारी निवडणूक होणार असून स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून दीपक सिरवानी तर शिवसेनेकडून कलवंतसिंग सोहतो यांनी अर्ज दाखल केले. स्थायी समिती मध्ये भाजपचे बहुमत असल्याने, सिरवानी यांची निवड निश्चित असल्याचे बोलले जात असून त्यांचे समिती सदस्य अज्ञातस्थळी आहेत.
उल्हासनगर महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदे आपल्याकडे राखण्यासाठी शिवसेना-ओमी कलानी टीम व भाजप-रिपाइं आघाडी आमनेसामने उभी ठाकली स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक बुधवारी १६ जून रोजी होणार आहे. स्थायी समिती मध्ये भाजप-रिपाइंचे बहुमत असले तरी, गेल्या वर्षी प्रमाणे शिवसेना काय राजकीय खेळी खेळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले. यातूनच स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूक काही दगाफटका होऊ नये, म्हणून भाजपने पक्षाचे समिती सदस्य अज्ञातस्थळी नेले. स्थायी समिती मध्ये भाजपचे-८, रिपाइं-१, शिवसेना-५, राष्ट्रवादी-१ व साई पक्षाचा-१ असे एकून १६ सदस्य असून १६ पैकी भाजप-रिपाइंचे ९ सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप-रिपाइं आघाडीकडून टोनी सिरवानी व शिवसेना आघाडीकडून कलवंत सोहतो यांनी महापालिका सचिव व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्याकडे आज अर्ज दाखल केले.
महापालिका प्रभाग समिती क्रं-१ च्या सभापती पदासाठी भाजप कडून मीना कौर लबाना तर शिवसेनेकडून अंजना म्हस्के व हरेश जग्याशी यांनी अर्ज दाखल केले. प्रभाग समिती क्रं-२ च्या सभापती पदासाठी भाजप कडून महेश सुखरामनी तर भाजप-ओमी टीम कडून छाया चक्रवर्ती, प्रभाग समिती क्रं-३ च्या सभापती पदासाठी भाजपकडून रवी जग्याशी तर शिवसेना-ओमी टीम कडून दीप्ती दुधानी तर प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती पदी भाजप कडून सुमन सचदेव व शिवसेनेकडून विकास पाटील यांनी अर्ज दाखल केले. भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवक शिवसेने सोबत असून राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका सुमन सचदेव यांनी भाजप कडून अर्ज दाखल केला. तर साई पक्षाचे बहुतांश नगरसेवकांनी गेल्या महापौर पदाच्या निवडणुकी पूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यातील बहुतांश नगरसेवक एकत्र येऊन प्रभाग समिती क्रं-३ च्या सभापती पदासाठी उमेदवार उभा केला.
शिवसेना-ओमी टीमच्या आघाडीचे संकेत
महापालिका महापौर पदाच्या निवडणुकी नंतर शिवसेने सोबत भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवक गेले होते. स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत त्यांची युती कायम असून स्थायी सभापती पद निवडणुकीत काही करिष्मा दाखवितात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे