भाजपा-शिवसेना सरकार लवकरच कोसळणार- अशोक चव्हाण
By admin | Published: March 30, 2017 05:39 PM2017-03-30T17:39:39+5:302017-03-30T17:39:39+5:30
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपाने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी मिळणार नाही
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - शेतकऱ्यांचे प्रश्न भाजपा सरकारला बिलकुल समजत नाहीत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपाने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी मिळणार नाही, असा पावित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम कापून घ्या, असा जी.आर. सरकारने नुकताच काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे भाजप-शिवसेनेचे हे सरकार आता फार काळ टिकणार नाही, ते लवकरच कोसळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी बुटीबोरी येथे केले.
शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष आणि एमआयएम या पक्षांनी संयुक्तपणे चांदा (चंद्रपूर) ते बांदा (पनवेल) पर्यंत संयुक्त संघर्ष यात्रा काढली आहे. चंद्रपूरपासून सुरु झालेली ही संघर्ष यात्रा गुरुवारी दुपारी १ वाजता बुटीबोरी येथे पोहोचली. बुटीबोरी चौकात जाहीर सभा पार पडली या सभेला मार्गदर्शन करताना खा. अशोक चव्हाण बोलत होते.
यावेळी संघर्ष यात्रेत सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, समाजवादी पार्टीचे नेते आ. अबू आजमी, शेकापचे आ. धैर्यशील पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, गोपाल अग्रवाल, राजेंद्र मुळक, अनिल देशमुख, मधुकर चव्हाण सुनील केदार, रमेश
बंग, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, माया चौरे, प्रा. बबनराव तायवाडे, नाना गावंडे, राजाभाऊ टांकसाळे, कुंदा राऊत, बंटी शेळके आदी उपस्थित होते. खा. अशोक चव्हाण म्हणाले, गरीब सामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार असते. परंतु श्रीमंतांच्या भाजप सरकारने सामान्यांना निराशाच दिली. भाजपच्या काळात गेल्या दोन वर्षात ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ती
अजुनही सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही ही संघर्ष यात्रा काढली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून ही संघर्ष यात्रा आहे. तेव्हा तुम्ही (शेतकऱ्यांनी) आम्हाला हिम्मत द्या, लाठ्या-काठ्या खायला आम्ही तयार आहोत. तुमच्या हिमतीवर हे हे काही दिवस उरलेले भाजपा-शिवसेनेचे सरकार कोसळेल, असेही ते म्हणाले.
सरकारने समृद्धी योजना आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. कायदा म्हणतो चार पट भाव मिळाला पाहिजे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस मात्र सरकारसोबत भागिदारी करा म्हणतात. जे सरकार कोसळणार आहे, त्याच्या सोबत कोण भागिदारी करणार ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी जयंत पाटील, कुंदा राऊत आदींनी मार्गदर्शन केले.
राजेंद्र मुळक यांनी संचालन केले.
- महाराष्ट्रात नव्या समीकरणाचे संकेत
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष, एमआयएम. युनायडेट जनता दल यासारखे विविध राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. ही आगामी महाराष्ट्रातील नव्या समीकरणाचे संकेत आहेत, असेही खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारवर खुनाच गुन्हा दाखल करा- शशिकांत शिंदे
भाजपाच्या काळात दोन वर्षात ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारच्या धोरणामुळे या आत्महत्या झाल्या आहेत. तेव्हा सरकार विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झापा पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. भाजपाचे सरकार हेबोगस मशीन आणि पैशाच्या भरवश्यार निवडून आले असल्याची टीकाही त्यांनी केली.
- अर्थसंकल्प केवळ अडाणी -अंबानीसाठी- धैर्यशील पाटील
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा केवळ अडाणी व अंबानीसाठी आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. उलट कपात करण्यात आली आहे. अशा वेळी आम्ही शेतकऱ्यांची बाजू लावून धरली तर आम्हला निलंबित करण्यात आले, अशी टीका शेकापचे आ. धैर्यशील पाटील यांनी केली.
- ... तर असा गुन्हा शंभर वेळा करणार- सुनील केदार
शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात लावून धरणे, सरकारशी भांडणे हा गुन्हा ठरत असेल तर असे गुन्हे १०० वेळा करू, असे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशची निवडणूक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी जिंकली तर मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज का माफ केले जात नाही? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
- व्यापाऱ्यांचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे का नाही- अबू आजमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक खोटारटे व्यक्ती आहेत, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आजमी यांनी केली. सर्वप्रथम प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील असे आश्वासन दिले. ते अजुन पाळले नाही. मोठ्या व्यापाऱ्यांचे कर्ज माफ केले जाते, मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ केले जात नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले म्हणून १९ आमदारांचे निलंबन करण्यात आले. तेव्हा या सरकारला अद्दल घडवा, असे आवाहनही अबू आजमी यांनी केले.