भाजपा-शिवसेनेत कलगीतुरा

By Admin | Published: September 18, 2016 02:34 AM2016-09-18T02:34:06+5:302016-09-18T02:34:06+5:30

गणपतीबाप्पाची पाठ फिरताच राज्यातील सत्ताधारी भाजपा व शिवसेना यांच्यात पितृपक्षातच वादाचे घट बसले आहेत.

BJP-Shiv Sena Kalagutura | भाजपा-शिवसेनेत कलगीतुरा

भाजपा-शिवसेनेत कलगीतुरा

googlenewsNext


ठाणे : गणपतीबाप्पाची पाठ फिरताच राज्यातील सत्ताधारी भाजपा व शिवसेना यांच्यात पितृपक्षातच वादाचे घट बसले आहेत. महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून केलेल्या व केल्या जाणाऱ्या कामांच्या श्रेयवादाकरिता गरबा रंगला आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील, तसतसे उभय बाजूंचे नेते आरोप-प्रत्यारोपांचे लक्ष्मीबॉम्ब, सुतळीबॉम्ब, सुरसुरी, फटाक्यांच्या लड्या परस्परांवर भिरकावतील. येत्या नवीन वर्षात प्रत्यक्ष मतदानापर्यंत व निकालानंतरही ही धूळवड सुरूच राहणार आहे. मोठागाव-माणकोली खाडीवरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावरून सुरू झालेला वाद असो की, ठाण्यातील विकासकामांच्या उद्घाटनावरून जुंपलेली भांडणे असो, केडीएमसीत महापौर राजेंद्र देवळेकर आणि स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांच्यात सुरू झालेले तू तू मैं मैं असो की, दिव्यातील असुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता महापालिका मुख्यालयासमोर गणेशमूर्तीची पूजा करायला आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची शिवसेनेच्या इशाऱ्यावर गठळी वळण्याचा प्रकार असो, ही सर्व लक्षणे पितृपक्षात वादाचे घट बसू लागल्याचीच आहेत.
अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली
मोठागाव-माणकोली खाडीवरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवंडीतील कोन परिसरात घेण्याच्या निर्णयामुळे शिवसेना प्रचंड नाराज झाली व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच डोंबिवलीत शासकीय कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर भूमिपूजन उरकून घेण्यात आले. अर्थात, शिंदे हे पालकमंत्री असल्याने या अनधिकृत भूमिपूजनापासून दूर राहिले.
शिवसेनेला वाकुल्या दाखवण्याकरिता भिवंडीत कार्यक्रम घेणाऱ्या भाजपाने आता सारवासारव सुरू केली असून एमएमआरडीएने हा कार्यक्रम घेण्याचे ठिकाण निश्चित केले, असा विश्वामित्री पवित्रा घेतला आहे. कार्यक्रमपत्रिकेत मीदेखील निमंत्रित आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ठाणे विभागाध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी दिली. यापूर्वी शिवसेनेने पाटील यांना काही कार्यक्रमांत डावलले, त्यामुळे त्यांच्या सूचनेवरून आणि पुढील वर्षी होणाऱ्या भिवंडी पालिका निवडणुकीवर डोळा ठेवून कार्यक्रमस्थळ निश्चित केल्याची चर्चा आहे.
सभागृह नेते राजेश मोरे, शहरप्रमुख भाऊ चौधरी आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनी भाजपाच्या खेळीला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याचा चंग बांधत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारीच भूमिपूजन उरकून घेण्यास राजी केले. रविवारच्या कार्यक्रमाला शिंदे यांना पालकमंत्री या नात्याने हजर राहायचे आहे. त्यामुळे ते स्वत: शिवसेनेच्या उपद्व्यापापासून दूर राहिले. मात्र, तरीही शिवसेनेच्या या कृतीचे आता काय पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्यासह विद्यमान खा. श्रीकांत शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण या साऱ्यांनीच या उड्डाणपुलाकरिता प्रयत्न केले आहेत. मात्र, तरीही निवडणुकीमुळे या भूमिपूजनाला श्रेयवादाचे गालबोट लागलेच.
>भिवंडीतील भाजपाच्या खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात कोणतीही उल्लेखनीय कामगिरी केली नसल्याने ते कल्याण- डोंबिवलीतील प्रकल्पांचे तेथे कार्यक्रम करत आहेत. खा. शिंदेंसह काही नेत्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे भूमिपूजन करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
- भाऊ चौधरी, शिवसेना शहरप्रमुख, डोंबिवली
काळ्या यादीतील
जे. कुमारला काम
मोठागाव-माणकोली उड्डाणपुलाचे काम मुंबई महापालिकेत काळ्या यादीत टाकलेल्या जे. कुमार या कंत्राटदाराला मिळाले असून त्याच कामाचा भूमिपूजन समारंभ करण्यास खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलेल्या तक्रारींवरून हा कंत्राटदार तेथे काळ्या यादीत समाविष्ट झाला, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

Web Title: BJP-Shiv Sena Kalagutura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.