भाजपा-शिवसेनेत कलगीतुरा सुरूच; एकमेकांना आव्हाने
By admin | Published: June 25, 2016 03:51 AM2016-06-25T03:51:04+5:302016-06-25T03:51:04+5:30
भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना ‘शोले’ चित्रपटातील असरानीशी केल्यानंतर आता ‘आमच्या भरवशावर तुमचे सरकार आहे याचे भान ठेवा
मुंबई : शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षातील वाक्युद्ध आता चांगलेच पेटले असून, आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा केली जात आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना ‘शोले’ चित्रपटातील असरानीशी केल्यानंतर आता ‘आमच्या भरवशावर तुमचे सरकार आहे याचे भान ठेवा. अन्यथा, भुजबळ-पवारांच्या भरवशावर सरकार चालविण्याची तुम्हाला मुभा आहे,’अशा शब्दांत शिवसेनेने भाजपाला सुनावले आहे.
खा. संजय राऊत यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना केंद्रातील मोदी सरकारची तुलना निजामाशी केली होती. त्यानंतर भाजपा प्रवक्ते भांडारी यांनी पक्षाच्या पाक्षिकात लेख लिहून उद्धव यांची तुलना ‘शोले’ चित्रपटात आसरानीने साकारलेल्या जेलरशी केली. निजामाच्या बापाच्या बिर्याणीवर ताव मारायचा आणि वरून यजमानांच्या नावानं बोटं मोडायची ही कुठली ‘सच्चाई’? असा थेट सवालही केला. हा पलटवार सेनेच्या थेट वर्मी लागला. त्यामुळे खा. राऊत यांनी आज थोडी बचावात्मक भूमिका घेतली. ते म्हणाले, भाजपाचे काही लोक ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करीत आहेत त्यांची ही भूमिका अधिकृत आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा. धोरणांवर टीका होऊ शकते, पण व्यक्तिगतरीत्या खालच्या स्तरावर जाऊन काही फडतूस मंडळी शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका-टिप्पणी करीत असतील तर ही त्यांच्या अकलेची दिवाळखोरीच आहे. बहुधा यांना स्वत:चे सरकार बुडवायचे आहे. आमच्या पाठिंब्यावर तुमचे सरकार चालू आहे याचे भान ठेवा. नाहीतर छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार चालविण्याची तुम्हाला मुभा आहे. जनता काय तो फैसला करील. शिवसेनेत प्रचंड खदखद आहे. ही खदखद उफाळली तर भारी पडेल, असा इशाराही खा. राऊत यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)
संयम ठेवा - दानवे
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविषयी बोलताना आदरभाव व्यक्त केला पाहिजे, अशी अपेक्षा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे. कोण्या एखाद्या वर्तमानपत्रात एखादी बातमी प्रसिद्ध केली म्हणून ते पक्षाचे मत होत नाही. वर्तमानपत्राला स्वत:चे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन दानवे यांनी केले आहे.
अमित शहा तर ‘गब्बरसिंग’!
सेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी अमित शहा यांची तुलना ‘शोले’मधील खलनायक ‘गब्बरसिंग’शी केली आहे. अमित शहा या भूमिकेला हुबेहुब शोभतात. त्यांचा कारभारदेखील तशाच प्रकारचा असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.