मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच सेना-भाजप वेगळे होणार - शरद पवार
By Admin | Published: May 4, 2015 12:53 PM2015-05-04T12:53:49+5:302015-05-04T14:22:00+5:30
मुंबई महापालिका निवडणूकांपूर्वी भाजपा-शिवसेनेची युती संपुष्टात येईले आणि ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ४ - मुंबई महापालिका निवडणूकांपूर्वी भाजपा- शिवसेनेची युती संपुष्टात येईल आणि ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सत्तेत सहभागी व्यक्तींकडूनच या संभाव्य दुराव्याबद्दल माहिती मिळाल्याचे पवार म्हणाले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी शेतक-यांसमोरील प्रश्न, पाणीपुरवटा, आर. आर. पाटील यांचे पोलिस प्रशासनातील काम अशा विविध मुद्यांवर भाष्य केले.
आव्हाडांच्या मताशी मी असहमत...
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असून मी त्यांच्याशी सहमत नाही, असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले. इतिहास तज्ज्ञ समजले जाणा-या बाबासाहेब पुरंद-यांनी जेम्स लेनच्या वादग्रस्त लिखाणावर टीका का केली नाही, असा खोचक प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल निषेध केला होता. त्यावरून वाद सुरू असतानाच पवारांनी मात्र आपण त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगत या वादात पडणे टाळले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. पेट्रोलचे दर वाढले, जीवनावश्यक वस्तूंचेही भाव वाढले.. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारबद्दल काय वाटते असा प्रश्न पवारांना विचारला असता 'दरवाढीने लोकांना अच्छे दिन दिसू लागले आहेत' अशी खोचक टिपण्णी करत त्यांनी मोदी सरकारला टोला हाणला.